आडगाव रंजे येथे सज्जा कार्यालयात तलाठ्याचा चाकूने भोसकून खून केला.  File Photo
हिंगोली

आडगाव रंजे येथे सज्जा कार्यालयात तलाठ्याचा चाकूने भोसकून खून

पुढारी वृत्तसेवा

आडगाव रंजे : पुढारी वृत्तसेवा : आडगाव रंजे बुवा (ता. वसमत) येथील तलाठी कार्यालयात फेरफार प्रलंबित ठेवल्याच्या कारणावरून तलाठ्याच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून चाकूने भोसकून खून केला. ही घटना बुधवारी (दि.२८) दुपारी १२.३० च्या सुमारास घडली. संतोष पवार असे मृत तलाठ्याचे नाव आहे. (Hingoli News)

याबाबत अधिक माहिती अशी की, वसमत तहसील कार्यालयांतर्गत संतोष पवार हे तलाठी म्हणून कार्यरत आहेत. त्यांना आडगाव रंजेबुवा व बोरीसावंत हे दोन तलाठी सज्जे देण्यात आले आहेत. मागील ३ वर्षांपासून ते या सज्याचे काम पाहत होते. दरम्यान, बुधवारी सकाळी तलाठी संतोष पवार हे नेहमी प्रमाणे आडगाव रंजेबुवा तलाठी सज्जा कार्यालयात येऊन कामकाज करीत बसले होते. दुपारी साडे बाराच्या सुमारास बोरी सावंत येथील एक तरुण दुचाकीवरून कार्यालयात आला. यावेळी त्याने तलाठी पवार यांच्याशी फेरफारावरून बाचाबाची करण्यास सुरवात केली. अचानक त्या तरुणाने काही कळण्याच्या आतच त्यांच्यावर चाकू हल्ला केला. यावेळी पोटात चाकूचे वार झाल्यामुळे तलाठी पवार घाबरले. अतिरक्तस्त्राव झाल्यामुळे जागेवरच कोसळले. त्यानंतर तरुणाने दुचाकीवरून पलायन केले.

या घटनेनंतर घटनास्थळी एकच आरडाओरडा सुरू झाला. तो ऐकून गावकऱ्यांनी तलाठी सज्जाच्या दिशेने धाव घेतली. गावकऱ्यांनी तलाठी पवार यांना उपचारासाठी परभणीच्या शासकीय रुग्णालयात नेले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकिय अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकाराची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार शारदा दळवी यांच्यासह हट्टा पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

याबाबत पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या घटनेला दुजोरा दिला असून प्रलंबित कामावरून हा प्रकार घडला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, अद्याप या घटनेचे नेमके कारण समोर आले नाही. तलाठी पवार यांच्या टेबलवर मिरचीपूड पडलेली असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणातील आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT