हिंगोली

Hingoli Accident : बारावीचा पेपर देऊन घरी परतताना काळाचा घाला; अपघातात विद्यार्थ्याचा मृत्यू

दोन मित्र गंभीर जखमी

पुढारी वृत्तसेवा

आडगाव रंजे : बारावीची परीक्षा देऊन आनंदाने घरी परतणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दुचाकीला भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वसमत तालुक्यातील बाराशिव येथे बुधवारी (दि. १८) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास झालेल्या या अपघातात माणिक सुदाम पारटकर (रा. आडगाव रंजे) या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचे दोन मित्र गंभीर जखमी झाले आहेत.

परीक्षेचा शेवटचा प्रवास ठरला जीवघेणा

मिळालेल्या माहितीनुसार, आडगाव रंजे येथील माणिक पारटकर (उर्फ मुन्ना) आणि त्याचे मित्र जवळाबाजार येथील परीक्षा केंद्रावर बारावी कला शाखेचा 'राज्यशास्त्र' विषयाचा पेपर देण्यासाठी गेले होते. पेपर संपवून दुचाकीने घरी परतत असताना बाराशिव शिवारात त्यांच्या गाडीला अपघात झाला.

या भीषण अपघातात माणिकचा दुर्दैवी अंत झाला. त्याच्यासोबत असलेले सुदर्शन बापुराव चव्हाण आणि करण बेंडे हे दोघेही गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे परभणी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घराचा एकमेव आधार हरपला; गावावर शोककळा

मृत माणिकच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. त्याचे वडील, भाऊ आणि आजी हे तिघेही दिव्यांग (अपंग) आहेत. अशा परिस्थितीत माणिक हाच संपूर्ण कुटुंबाचा भविष्यातील एकमेव आधार होता. घरातील कर्त्या मुलाचे अशा प्रकारे अचानक निधन झाल्याने पारटकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे आडगाव रंजे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT