Dandegaon school exam fee issue
दांडेगाव : कळमनुरी तालुक्यातील दांडेगाव येथील नरहर कुरूंदकर शिक्षण संस्था संचलित छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील बारावीच्या तब्बल 10 ते 15 विद्यार्थ्यांना प्रथम सत्राच्या परिक्षेची फिस न भरल्याने चक्क वर्गाबाहेर हाकलल्याचा गंभीर प्रकार शनिवारी (दि.११) घडला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून परीक्षा शुल्क न भरल्यामुळे विद्यार्थ्यांना परिक्षेस न बसू देणे म्हणजे शिक्षणाचे खुलेआम बाजारीकरण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
दांडेगाव येथे छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आहे. या विद्यालयात परिसरातील दहा ते बारा गावांमधील मुले शिक्षणासाठी येतात. सध्या या शाळेत इयत्ता बारावीच्या प्रथम सत्राची परिक्षा सुरू आहे. शिक्षण संस्थेने प्रथम सत्राच्या परिक्षेसाठी दीडशे रूपयांची फिस आकारली होती. काही विद्यार्थ्यानी परिक्षेची फिस भरली तर दहा ते पंधरा विद्यार्थी मात्र घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे फिस भरू शकले नाहीत. पंधरा दिवसांपुर्वीच अतिवृष्टी झाल्याने या परिसरातील शेतकरी प्रचंड अडचणीत सापडल्याने काही पालक विद्यार्थ्यांची फिस भरू शकले नाही. शनिवारी ज्या मुलांनी फिस भरली नाही त्यांना चक्क वर्गातून बाहेर काढण्याचे फर्मान शाळेच्या मुख्याध्यापकाने काढले.
विद्यार्थी रडत रडतच वर्गाबाहेर आले. हा प्रकार म्हणजे शाळा प्रशासनाच्या निर्दयतेचा कळस ओलांडणारा ठरला आहे. विद्यार्थी बाहेर येताच त्यांनी थेट आमदार संतोष बांगर यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी मुख्याध्यापक काळे यांना विद्यार्थ्यांची फिस मी भरतो. तुम्ही त्यांना परिक्षेस बसु द्या अशी विनंती केली तरीही पंधरा विद्यार्थ्यांना परिक्षेला बसु दिले नाही. काही दिवसांपुर्वीच बारावीच्या बोर्डाची 750 रूपये फिस विद्यार्थ्यानी भरली. परंतू, काही विद्यार्थ्यांच्या घरची परिस्थिती बिकट असल्याने ते मात्र प्रथम सत्राच्या परिक्षेची फिस भरू शकले नाहीत. परंतू, शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या गरीबीची जाणीव ठेवून त्यांना परिक्षेस बसू देणे गरजेचे होते. निर्दयी शिक्षक व मुख्याध्यापकाने संस्था चालकाची मर्जी राखण्यासाठी विद्यार्थ्यांना चक्क वर्गाबाहेर काढल्याने या प्रकाराची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
प्रशांत पुंड, शिवराज उन्हाळे, पवन उन्हाळे, समाधान गजभार, विनायक लांडगे, शिवम पुंड, बालाजी पांडव, प्रथमेश बेंडे, गोविंद पुंड, आनंद ठाकुर, कृष्णा लांडगे, हितेश ढेंबरे, विष्णु पांडव, निलेश साळुंके या विद्यार्थ्यांना परीक्षेतून हाकलून दिल्याचे त्यांनी लेखी सांगितले. माझ्या पाल्याची काही दिवसांपूर्वीच बोर्डाच्या परीक्षेची 750 रूपये फिस भरली. परंतू, प्रथम सत्र परिक्षेची 150 रूपये फि मी देऊ न शकल्याने माझ्या पाल्यास परीक्षेस बसू दिले नाही हा प्रकार निंदनीय आहे. आम्ही तो खपवून घेणार नाही, असे दांडेगाव येथील पालक गजानन उन्हाळे यांनी सांगितले.
दरम्यान, शाळेचे मुख्याध्यापक काळे यांच्याशी संपर्क साधले असता त्यांनी या घटनेस दुजोरा दिला. परंतू, आम्ही विद्यार्थ्यांना परिक्षा देण्याची विनंती देखील केल्याचे त्यांनी सांगितले.
शासनाचे या शाळेसाठी लाखो रूपयांचे अनुदान दरवर्षी मिळते. परंतू, शाळेत वाचनालय नाही. शौचालय व मुतारीची दुरावस्था झाली आहे. मागील अनेक दिवसांपासून संगणक कक्ष देखील बंद अवस्थेत आहे. या शाळेतील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी पायपीट करून शाळेत येतात. परंतू, शाळेत विद्यार्थ्याना आवश्यक त्या सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत. केवळ विद्यार्थ्यांचे आर्थिक शोषण केले जात असल्याचे या प्रकारावरून समोर आले आहे.