Heavy rain in Hingoli
हिंगोली : पुढारी, वृत्तसेवा पावसाळा सुरू होऊन दीड महिन्यापेक्षा अधिक काळ गेला तरी समाधानकारक पाऊस झाला नव्हता. त्यामुळे शेतकरी चिंतेत होते. शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास जिल्हाभरात ढगांच्या कडकडाटासह दमदार पावसाने हजेरी लावली. जवळपास दोन तास झालेल्या पावसामुळे पहिल्यादांच नदी, नाल्यांना पाणी आले. यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच हिंगोलीची जीवनदायीनी म्हणून ओळख असलेली कयाधू नदी दुथडी भरून वाहिली.
जिल्ह्यात दरवर्षी सरासरी ७५० ते ८५० मि.मि. पाऊस पडतो. यंदा हवामान खात्याने १०६ टक्के पावसाचा अंदाज वर्तविला होता. परंतु, मागील पावणे दोन महिन्यात दमदार पाऊस झालाच नाही. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात झालेल्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या पुर्ण केल्या.
त्यानंतर अधून-मधून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. शेतकरी दमदार पावसाच्या प्रतिक्षेत होते. दमदार पावसाअभावी लघु व मध्यम प्रकल्पात पाणीसाठा झालाच नाही. मोठ्या प्रकल्पात मात्र समाधानकारक पाणीसाठा झाला. येलदरी ७० टक्के, सिद्धेश्वर ६४ टक्के तर इसापूर ८५ टक्के भरले. त्यामुळे मुख्य शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला. परंतू, लघु व मध्यम प्रकल्पात मात्र अद्यापही पुरेसा पाणीसाठा झालेला नाही. गतवर्षीच्या तुलनेत ५ ऑगस्टपर्यंत ३० टक्के पावसाची तुट राहिली.
शुक्रवारी पहाटे झालेल्या दमदार पावसामुळे पिकांसह लघु व मध्यम प्रकल्पांना दिलासा मिळाल्याचे चित्र आहे. नदी, नाले तुथडी भरून वाहिले.
पावसाळ्यातील पहिलाच दमदार पाऊस झाला असून अजूनही मोठ्या पावसाची शेतकर्यांना प्रतिक्षा आहे. शुक्रवारी पहाटे झालेल्या पावसाची नोंद ४० मि.मि. करण्यात आली. आतापर्यंत जिल्ह्यात ३०० मि.मि. पाऊस झाल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.