हिंगोली : उत्तराखंड राज्यातील हल्द्वानी येथील रामलीला मैदानावर राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या सभेनंतर त्या ठिकाणी गोमूत्र शिंपडून मंत्रोच्चाराद्वारे ‘शुद्धीकरण’ करण्यात आल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रतीकात्मक मुंडण व पिंडदान आंदोलन करण्यात आले. राज्यसभा खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात हे आंदोलन करण्यात आले.
सामाजिक समता, बंधुता, मानवी प्रतिष्ठा आणि भारतीय संविधानाच्या मूलभूत मूल्यांच्या विरोधात जाणाऱ्या प्रतिगामी प्रवृत्तींचा यावेळी तीव्र निषेध करण्यात आला. या आंदोलनात भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद कुलदीपके यांनी स्वतः गाढवाचे मुंडण करून सदर घटनेचा निषेध व्यक्त केला. तसेच प्रतीकात्मक पिंडदान विधी करून जातीय व सामाजिक भेदभावाला प्रोत्साहन देणाऱ्या प्रवृत्तींच्या विरोधात आपली भूमिका स्पष्ट करण्यात आली.
यावेळी बोलताना प्रमोद कुलदीपके म्हणाले की, भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला समानता, स्वातंत्र्य आणि बंधुतेचा अधिकार दिला आहे. कोणत्याही व्यक्तीच्या उपस्थितीमुळे एखादी जागा अपवित्र होते आणि त्यानंतर तिचे शुद्धीकरण करावे लागते, अशी मानसिकता सामाजिक समता व संविधानिक मूल्यांना छेद देणारी आहे. अशा प्रवृत्तींचा लोकशाही मार्गाने निषेध करणे आवश्यक आहे.
भीमशक्तीच्या वतीने या आंदोलनातून सामाजिक समता, संविधानिक मूल्य आणि बंधुतेचा संदेश देण्यात आला. भविष्यातही समाजात भेदभाव व प्रतिगामी विचारांना प्रोत्साहन देणाऱ्या प्रवृत्तींच्या विरोधात लोकशाही व शांततापूर्ण मार्गाने संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
आंदोलनात जिल्हाध्यक्ष प्रमोद कुलदीपके, युवा जिल्हाध्यक्ष विशाल इंगोले, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सतीश पाचपुते, बंटी नागरे, विशाल घुगे, जुबेर मामू, काशिनाथ गायकवाड, राहुल घोडके, कैलास कुलदीपके, विकास कुलदीपके, संतोष गायकवाड, शिवाजी कुलदीपके, सुजल कुलदीपके, गजानन द्यायक, विकास कुलदीपके, सतीश कुलदीपके आदी उपस्थित होते.