हिंगोली जिल्हा बँक 
हिंगोली

Hingoli |जिल्हा बँकेच्या राजकारणात गोरेगावकरांची तिसरी पिढी

District Bank Politics- राजवर्धन पाटील बिनविरोध, बाप-लेक एकाच वेळी बँकेत

पुढारी वृत्तसेवा

गजानन लोंढे

हिंगोली: परभणी-हिंगोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून गेल्या अनेक दशकांपासून माजी राजवर्धन पाटील आमदार साहेबराव पाटील गोरेगावकर यांच्यासह त्यांचे पुत्र राजेश पाटील यांनी जिल्हा बँकेवर वर्चस्व गाजविले. आता माजी आमदार साहेबराव पाटील यांचे नातू राजवर्धन पाटील हे देखील सेनगाव गटातून पहिल्याच निवडणुकीत बिनविरोध निवडून आले आहेत. गोरेगावकर यांची तिसरी पिढी जिल्हा बँकेत कार्यरत झाल्याने सर्वसामान्यांना मात्र या निवडणुकीत संधी मिळाली नाही.

माजी आमदार साहेबराव पाटील व त्यांचे पुत्र राजेश पाटील मागील अनेक वर्षांपासून जिल्हा बँकेचे संचालक राहिले आहेत. राजेश पाटील यांचे पुत्र राजवर्धन पाटील यांनी लंडन येथे एम.बी.ए. पूर्ण करून जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून राजकारणाचा यशस्वीरीत्या श्रीगणेशा केला आहे. राजकारणाच्या पदार्पणातच राजवर्धन यांनी जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध जिंकत आपल्या नेतृत्वाची कसब दाखविली आहे.

तर दुसरीकडे जिल्हा बँकेचे मावळते उपाध्यक्ष राजेश पाटील हे देखील औंढा गटातून बिनविरोध आल्याने एकाच वेळेस बाप-लेक जिल्हा बँकेत बिनविरोध निवडून आल्याचा इतिहास झाला आहे. यापूर्वीही माजी आमदार साहेबराव पाटील व राजेश पाटील हे दोघे पिता-पुत्र जिल्हा बँकेवर निवडून गेले होते. आता साहेबराव पाटील यांचे नातू राजवर्धन देखील जिल्हा बँकेचे संचालक झाले आहेत. एकेकाळी हिंगोली विधानसभा मतदार संघाचे वजनदार नेते म्हणून माजी आमदार साहेबराव पाटील यांची ओळख होती. परंतु, मागील तीस वर्षांपासून साहेबराव पाटील यांचा गट आमदारकीपासूना वंचित राहिला आहे.

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत रूपाली पाटील गोरेगावकर यांनी उल्लेखनीया मते घेत विद्यमान आमदार मुटकुळे यांना जोरदार टक्कर दिली होती. गोरेगावकरांच्या घरात पुन्हा आमदारही आणण्यासाठी उच्चशिक्षीत व तरुणा असलेले राजवर्धन पाटील यांना आता राजकारणात पुढे केले गेले आहे.. भविष्यात आमदार मुटकुळे यांचे चिरंजीव शिवाजी मुटकुळे व राजेश पाटील गोरेगावकर यांचे चिरंजीवा राजवर्धन पाटील यांच्यात विधानसभेचा सामना रंगणार असल्याचे बोलले जाता आहे.

प्रस्थापित पक्षातील घराणेशाही अधोरेखित

जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील उमेदवारांची नावे पाहता घराणेशाही स्पष्टपणे दिसून येते. आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला असला तरी त्यांच्या सुनबाई राजामती शिवाजी मुटकुळे या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. कोणत्याही परिस्थितीत राजकीय पद सामान्य कार्यकर्ता किंवा पक्षसंघटनेतील कार्यकर्त्याना सोडायचे नाही हीच भावना यातून दिसून येते. भाजपकडून नेहमी काँग्रेसमधील घराणेशाहीवर टीका केली जाते. परंतु, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मात्र काही अपवाद वगळता प्रस्थापित राजकीय घराण्यातीलच उमेदवार उभे ठाकले आहेत. एकूणच सामान्य शेतकरी कुटुंबातील सदस्यांना जिल्हा बँकेची निवडणूक लढविण्याची संधी प्रस्थापित राजकारणी देत नसल्याची भावना व्यक्त होऊ लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT