हिंगोली : दिवाळीच्या सणात सोने-चांदीच्या दरांनी ऐतिहासिक उच्चांक गाठल्यानंतर आता जागतिक बाजारपेठेत दरांमध्ये घसरण सुरू झाली आहे. महिनाभरात २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति १० ग्रॅममागे १३ हजार रूपयांनी तर चांदीचे दर प्रति किलोमागे ४५ हजार रुपयांनी घसरले आहेत. सोन्या-चांदीचे दर इतके खाली आल्याने ग्राहकांना खरेदीची मोठी सुवर्णसंधी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत होती. मात्र, दर आणखी कमी होण्याची शक्यता गृहीत धरून ग्राहकांनी खरेदीचा निर्णय लांबणीवर टाकला आहे.
विशेष म्हणजे, लग्नसराईचा हंगाम सुरू झाला असूनही सराफा बाजारात अपेक्षित तेजी दिसून येत नाही. दुकानांमध्ये ग्राहकांची चौकशी वाढली असली, तरी प्रत्यक्ष खरेदीसाठी हात आखडता घेतला जात असल्याचे चित्र आहे.
दिवाळीच्या काळात सोन्याच्या गगनाला भिडलेल्या किमतींमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट पूर्णपणे कोलमडले होते. त्यामुळे अनेकांनी सणासुदीची खरेदी पुढे ढकलली होती. आता दिवाळीनंतर सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्याने बाजारात ग्राहकांची वर्दळ वाढेल आणि उलाढाल पूर्वपदावर येईल, अशी सराफा व्यावसायिकांना अपेक्षा होती. मात्र, दरातील या मोठ्या घसरणीचा फायदा घेण्याऐवजी ग्राहक दर आणखी स्वस्त होण्याची प्रतीक्षा करीत आहेत. लग्नसराईच्या काळात सोन्याच्या दागिन्यांना विशेष मागणी असते.
विवाह सोहळ्यांसाठी मंगळसूत्र, नेकलेस, कानातील दागिने, अंगठ्या तसेच पूजेच्या व भेटवस्तूंसाठी चांदीच्या वस्तूंची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाते. परंतु, यंदा वाढून स्थिरावलेले दर, शेतीतील प्रतिकूल परिस्थिती आणि सर्वसामान्यांच्या मर्यादित आर्थिक उत्पन्नाचा थेट परिणाम खरेदीवर होत आहे. लग्नासाठी दागिने घेण्याचे नियोजन असलेली अनेक कुटुंबे सध्या सराफा दुकानांमध्ये जाऊन नवीन डिझाइन्स आणि दरांची माहिती घेत आहेत. मात्र प्रत्यक्ष खरेदी करण्यापूर्वी दर आणखी कमी होण्याची वाट पाहत आहेत.
जागतिक बाजारपेठेत सोने-चांदीच्या भावात सातत्याने घसरण होत असली, तरी त्याचा अपेक्षित सकारात्मक परिणाम स्थानिक बाजारातील खरेदीवर अद्याप झालेला नाही. त्यामुळे सध्या सराफा बाजारात चौकशी अधिक आणि खरेदी कमी, अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. आगामी आठ दिवसांत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील दरांची दिशा आणि स्थानिक ग्राहकांचा प्रतिसाद यावर सराफा बाजारातील तेजी-मंदीचे पुढील चित्र स्पष्ट होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली.
पावसामध्ये ३० टक्के तूट पडल्याने सर्वत्र दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे. त्यातच बाजारपेठेतही म्हणावी तशी गर्दी दिसून येत नाही. त्यामुळे मंदीचे सावट जाणवत आहे. लग्नसराईचा हंगाम सुरू झाला असून सोन्याच्या दरात घसरण झाली असली तरी ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. सोने-चांदीचे दर आणखी कमी होतील की आणखी वाढतील असा संभ्रम निर्माण झाला आहे.