बनावट नोट असल्याचे सांगत 18 हजार पळविले file photo
हिंगोली

Fake currency fraud case : बनावट नोट असल्याचे सांगत 18 हजार पळविले

भामटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

पुढारी वृत्तसेवा

सेनगाव : येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेतून पैसे काढल्यानंतर नोटांच्या बंडलमध्ये एक नोट बनावट असल्याचे सांगत दोन भामट्यांनी 18 हजार 500 रुपये पळविल्याची घटना गुरुवारी घडली. दोन भामटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून पोलिसांनी त्यांचा शोध सुरु केला आहे.

येथील वर्षा तळणकर गुरुवारी दुपारी महाराष्ट्र ग्रामीण बँकेत पैसे काढण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी त्यांनी बँकेतून 1 लाख रुपयांची रक्कम काढली होती. यामध्ये पाचशे रुपयांचे दोन बंडल देण्यात आले. याचवेळी दोन भामटे त्यांच्या पैशावर नजर ठेऊन होते. तळणकर यांनी पैसे काढल्यानंतर घरी जाण्यासाठी निघाल्या. मात्र त्या ठिकाणी बाजूलाच बसलेल्या दोन भामट्यांनी तुमच्याकडे असलेल्या नोटांच्या बंडलमधील वरची नोट बनावट असल्याचे सांगितले.

आता आणखी किती नोटा बनावट आहे याची तपासणी करतो असे सांगितले. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्यांनी भामट्यांजवळ एक बंडल दिले. मात्र यावेळी भामट्यांनी बनावट नोटा तपासणीचे नाटक करून त्यातील 18 हजार 500 रुपये हातचालाखीने काढून घेतले अन्‌‍ आता बनावट नोटा नाहीत असे सांगत बंडल त्यांच्या हवाली केले. अवघ्या काही वेळातच त्यांनी हा प्रकार केला अन्‌‍ वाहनावरून धूम ठोकली.

काही वेळानंतर बंडलमध्ये काही नोटा कमी असल्याचे तळणकर यांना जाणवले. त्यांनी तातडीने सदर प्रकार बँकेत व सेनगाव पोलिसांना सांगितला. सेनगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक दीपक मस्के, उपनिरीक्षक रवीकिरण खंदारे, जमादार सुभाष चव्हाण यांच्या पथकाने बँकेत भेट दिली. यावेळी त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता त्यात डोक्यावर टोपी घातलेले दोन भामटे दिसून आले. त्यावरून पोलिसांनी आता त्यांचा शोध सुरू केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT