Fire at a home-based firecracker warehouse in Hingoli; two dead
हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : शहरातील अत्यंत गर्दीच्या आणि रहिवासी भाग असलेल्या मारवाडी गल्ली (कपडा गल्ली) परिसरात घरातच असलेल्या फटाक्यांच्या गोदामाला सोमवारी (दि.५) रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या दुर्दैवी दुर्घटनेत दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला असून १५ जण गंभीर जखमी झाले आहेत.
आग विझवण्यासाठी घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलाच्या गाडीलाच फटाक्यांच्या स्फोटांमुळे आग लागली. आजूबाजूची काही घरेही या आगीच्या भक्षस्थानी सापडली. आगीत मरण पावलेल्या दोघांची ओळख पटलेली नाही. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता पोलिस सूत्रांनी व्यक्त केली.
भागात गोपाल बासटवार यांचे घर आणि हिंगोली शहरातील कपडा गल्ली घरातच फटाक्यांचे गोदाम आहे. बासटवार हे फटाक्यांचे मोठे ठोक विक्रेते असल्याने त्यांनी दिवाळीच्या तोंडावर गोदामात मोठ्या प्रमाणावर फटाक्यांचा साठा करून ठेवला होता. सोमवारी रात्री साडेसात ते पावणेआठ वाजेच्या सुमारास अचानक या गोदामातून धुराचे लोट निघू लागले. काही क्षणांतच या आगीने रौद्ररूप धारण केले आणि गोदामातील फटाक्यांचे एकामागून एक मोठे स्फोट होऊ लागले. फटाक्यांच्या भीषण आवाजाने आणि धुराच्या लोटांनी संपूर्ण परिसर हादरून गेला. काही क्षणातच या आगीने आणि फाटाक्याच्या स्फोटांनी आजूबाजूच्या घरानांही आपल्या कवेत घेतले.
घटनेची माहिती मिळताच आमदार संतोष बांगर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यापाठोपाठ अग्रिशमन दलाचे पथकही घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी जीवाची पर्वा न करता आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. मात्र, गोदामात साठवलेल्या फटाक्यांचे सतत स्फोट होत राहिल्याने आग विझवण्यात मोठे अडथळे येत होते. याचदरम्यान झालेल्या एका प्रचंड स्फोटामुळे आगीच्या ज्वाला थेट अग्निशमन दलाच्या वाहनापर्यंत पोहोचल्या आणि अग्रिशमन दलाची गाडीच आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. या दुर्घटनेत अग्निशमन दलाचे २ कर्मचारी गंभीर भाजले आहेत.
आजूबाजूंच्या घरांनाही आग
बासटवार यांच्या घरातील फटाक्यांना आग लागल्यानंतर काही क्षणातच फटाक्याचा स्फोट होऊन आजूबाजूच्या घरांवर पडले. त्यामुळे अनेक घरांना आग लागली. या आगीत आसपासच्या घरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे कळते.
दोन जणांचा होरपळून मृत्यू; ओळख पटेना
आग लागलेल्या स्थळालगत दोन जणांचे भाजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आले आहेत. स्फोट झाला त्यावेळी ते दोघेही दुचाकीवर त्या घरासमोरून जात होते. त्याचवेळी स्फोटात सापडले, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. आगीची तीव्रता इतकी प्रचंड होती की मृतदेहांची ओळख पटवणे कठीण झाले आहे.
सहा जण गंभीर
या आगीत नगरसेवक कपिल खंडेलवाल, भरत चौधरी, दिनेश चौधरी, अमित चौधरी, शैलेंद्र नांदेडकर यांच्यासह १५ ते १६ जण होरपळले. यातील सहा जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना अधिक उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते.