हिंगोली : जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती पदांचे आरक्षण शुक्रवारी जाहीर करण्यात आले असून, तीन पंचायत समितींवर महिला सभापतींचा राज येणार आहे. तर कळमनुरी पंचायत समितीचे सभापतिपद सर्वसाधारण गटासाठी सुटल्यामुळे येथील निवडणुकीत चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात हिंगोली, कळमनुरी, सेनगाव, वसमत आणि औंढा नागनाथ या पाच पंचायत समिती आहेत. हिंगोलीत 20, कळमनुरीत 22, सेनगाव 20, औंढा नागनाथ 18 आणि वसमत तालुक्यात 24 पंचायत समिती गट आहेत. जिल्हा परिषदच्या 52 गटांसह 104 पंचायत समिती गटांसाठी लवकरच निवडणुका होणार आहेत. यासाठी प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे.
सोमवारी पाचही तालुक्यांमधील उपविभागीय अधिकारी कार्यालयात जिल्हा परिषद गटांचे आरक्षण जाहीर करण्यात आले. त्यानंतर, शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या प्रमुख उपस्थितीत पाचही पंचायत समितीच्या सभापती पदासाठी आरक्षण सोडले गेले.
त्यानुसार वसमत पंचायत समिती – अनुसूचित जाती (एससी), औंढा नागनाथ – अनुसूचित जमाती (महिला), सेनगाव – नागरीकांचा मागास प्रवर्ग (महिला), हिंगोली – सर्वसाधारण (महिला), कळमनुरी – सर्वसाधारण असे आरक्षण मिळाले.
यावरून तीन पंचायत समितींवर महिला सभापतींचा राज येणार असून, कळमनुरीत सर्वसाधारण गटासाठी निवडणुकीत चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे. पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता जिल्हा परिषद गटाच्या आरक्षणाकडे राजकीय वर्तुळांचे लक्ष लागले आहे.