Turmeric Company Raid Vasmat Pudhari
हिंगोली

Hingoli FDA Raid | वसमतमध्ये हळद पावडर कंपनीवर FDA चा छापा; ६०.५० लाखांचा साठा जप्त, परवाना रद्द

गणराज इंडस्ट्रीजवर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; तालुक्यातील अन्य कंपन्यांवरही कारवाई होणार का?

पुढारी वृत्तसेवा

Turmeric Company Raid Vasmat

वसमत : वसमत तालुक्यातील नामांकित हळद पावडर उत्पादक मेसर्स गणराज इंडस्ट्रीजवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) धडक कारवाई केली आहे. अन्न सुरक्षा मानकांचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणात कंपनीच्या गोदामातील तब्बल ६० लाख ५० हजार रुपये किमतीचा हळद पावडर साठा जप्त करण्यात आला असून, कंपनीचा अन्न परवानाही रद्द करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरातील हळद पावडर उत्पादक आणि व्यापारी क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गणराज इंडस्ट्रीजमध्ये उत्पादित होणाऱ्या हळद पावडरच्या गुणवत्तेबाबत अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींच्या अनुषंगाने संबंधित अधिकाऱ्यांनी कंपनीवर छापा टाकून हळद पावडरचे नमुने तपासणीसाठी घेतले. तपासणीमध्ये भेसळ आणि अन्नसुरक्षा कायद्याच्या तरतुदींचे उल्लंघन झाल्याचे आढळल्याने प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत प्रशासनाने कंपनीचा अन्न परवाना रद्द केला. तसेच गोदामातील ६० लाख ५० हजार रुपये किमतीचा हळद पावडर साठा जप्त करून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे.

अन्य कंपन्यांवरही कारवाई होणार का?

वसमत तालुक्यात हळद पावडर उत्पादन आणि प्रक्रियेशी संबंधित अनेक कंपन्या कार्यरत आहेत. या कंपन्यांमध्ये तयार होणारा कच्चा माल पुढील प्रक्रियेसाठी तसेच पॅकिंगसाठी एमआयडीसी परिसरातील विविध उद्योगांकडे पाठविला जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या संपूर्ण उत्पादन साखळीतील मालाची गुणवत्ता, अन्नसुरक्षा मानकांचे पालन आणि संबंधित कंपन्यांच्या परवान्यांची तपासणी करण्याची गरज व्यक्त होत आहे.

गणराज इंडस्ट्रीजवरील कारवाईनंतर आता तालुक्यातील अन्य हळद पावडर उत्पादक कंपन्यांचीही तपासणी होणार का, तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांवर प्रशासन कठोर कारवाई करणार का, असा सवाल उपस्थित होत आहे. अन्नपदार्थांच्या गुणवत्तेशी संबंधित प्रकरणांमध्ये नियमित तपासणी आणि कठोर अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT