Farmers oppose land measurement for Shaktipeeth highway
वसमत, पुढारी वृत्तसेवा :
तालुक्यातून जाणाऱ्या शक्तिपीठ महामार्गासाठी जबरदस्तीने जमीन संपादीत केल्यास सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा राजा-पूरच्या शेतकऱ्यांनी दिला आहे. या भागात बुधवारी जमीन मोजणीला आलेल्या अधिकाऱ्यांना विरोध केला.
नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्गाला हिंगोली जिल्हयातून मोठा विरोध होऊ लागला आहे. कळमनुरी व वसमत तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमीनी या महामार्गासाठी संपादीत केल्या आहेत. त्यासाठी प्रशासनाने मोजणीचे कामही हाती घेतले आहे. मात्र बहुतांश ठिकाणी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या विर जाणार ोधाला सामोरे जावे लागत आहे.
वसमत तालुक्यात मोजणीसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना मोजणी न करताच परत पाठविले जात आहे. तर दुसरीकडे शेतकरी शेत चर्चा करण्यासाठीही नकार देत असल्याने प्रशासनासमोरील अडचणी चांगल्या वाढल्या आहेत. दरम्यान, बुधवारी वसमत तालुक्यातील राजापूर येथे प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी जमीनीची मोजणी करण्यासाठी गेले होते. याबाबतची माहिती मिळताच परिसरातील शेतकरी एकत्र आले. या शेतकऱ्यांनी जमीन मोजणीला तिव्र विरोध दर्शविला.
शेतकरी या शिवारात अल्पभूधारक आहेत. बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये विंधन विहीर, विहीर असून कालव्याचे पाणी शेती सिंचनासाठी मिळते. यामुळे शेतकरी बारमाही पिके घेतात. शासनाने शक्तिपीठ महामार्गासाठी जमीन संपादीत केल्यास शेतकऱ्यांकडे जमीनी शिल्लक राहणार नाहीत. त्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार आहे.
शासनाने तसेच प्रशासनाने जमीन संपादीत करण्यासाठी जबरदस्ती केल्यास सामुहिक आत्मदन करण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी यावेळी दिला. यावेळी उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी शेतकऱ्यांनी संवाद साधला. मात्र शेतकऱ्यांचा विरोध कायम होता. त्यानंतर शेतकरी सुरेश पवळे, विठ्ठळराव पवळे, संजय पवळे, सुदाम पवळे, चांदू पवळे, मदन पवळे, उत्तम पवळे, चंद्रभान पवळे, उत्तम मनोहरे, महादु मनोहरे, शेषराव मनोहरे यांच्यासह शेतकऱ्यांनी निवेदन सादर केले.