Drown death Pudhari
हिंगोली

Drown death news : तलाव सुशोभीकरणासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात बुडून ८ वर्षीय बालकाचा मृत्यू

नगरपालिकेच्या निष्काळजीपणामुळे निष्पाप बालकाचा जीव गेल्याचा गंभीर आरोपही कुटुंबीयांनी केला आहे

पुढारी वृत्तसेवा

वसमत : शहरातील काजीपुरा परिसरातील मोठ्या तलावाच्या सुशोभीकरणाच्या कामासाठी खड्डा खोदण्यात आला होता. या उघड्या खड्ड्यात साचलेल्या पावसाच्या पाण्यात बुडून आठ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (८ ऑगस्ट) सायंकाळी घडली. हसन शेख जाबेर असे मृत बालकाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, संबंधित कामाच्या ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव असल्याचा आरोप कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे.

वसमत येथील मोठ्या तलावाचे सुशोभीकरणाचे काम मागील सुमारे सहा महिन्यांपासून सुरू आहे. या कामासाठी मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले असून, या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचले आहे. शनिवारी सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास हसन शेख जाबेर हा आपल्या मित्रांसोबत शेजारील दर्ग्याकडे जात असताना उघड्या खड्ड्यात पडला.

खड्ड्यात पाणी साचलेले असतानाही त्या ठिकाणी कोणतेही बॅरिकेड्स, धोक्याचे फलक किंवा संरक्षक भिंत उभारण्यात आली नसल्याचे सांगण्यात येत आहे. बालक खड्ड्यात पडल्याचे लक्षात आल्यानंतर नागरिकांनी त्याला पाण्यातून बाहेर काढले. त्यानंतर तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

या घटनेनंतर मृत बालकाच्या कुटुंबीयांनी आणि परिसरातील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. सुशोभीकरणाचे काम सुरू असताना नागरिकांच्या, विशेषतः लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. नगरपालिकेच्या निष्काळजीपणामुळे निष्पाप बालकाचा जीव गेल्याचा गंभीर आरोपही कुटुंबीयांनी केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT