हिंगोली, पुढारी वृत्तसेवा: खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी धनगर समाजाचा अपमान करून संविधानिक पदाचा अवमान केल्यामुळे त्यांचे सदस्यत्व रद्द करून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी धनगर समाजाच्या वतीने लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्याकडे करण्यात आली आहे. तसेच खा. पाटील यांच्या निषेधार्थ सोमवारी जिल्हाधिका-यांना निवेदन देण्यात आले.
खासदार नागेश पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत धनगर समाजाला अनुसूचित जमातीत आर क्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी निवडून आल्यानंतर संसदेत आवाज उठविण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे निवडणुकीत धनगर समाजाने आष्टीकर यांना मतदान करून मताधिक्याने निवडून आणले. मागील काही दिवसांपासून धनगर समाज एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी आंदोलन करीत आहे.
आंदोलनादरम्यान खा. पाटील यांनी धनगर समाजाला एस टी आरक्षणाची अंमलबजावणीकरिता लेखी पत्र दिले होते. परंतु एका दिवसातच धनगर समाजाचा अपमान करत सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रसारित केला. त्यामध्ये मी एसटी आरक्षणाच्या पाठिंब्याचे शिफारस पत्र दिले नाही असे सांगितले.
खासदारांनी शासकीय लेटरपॅडवर जाहीर पाठिंबा देऊन नंतर घुमजाव करून धनगर एस टी आरक्षणाला विरोध करत अपमान करून संविधानिक पदाचा अवमान केल्यामुळे त्यांचे सदस्यत्व रद्द करून त्यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा अन्यथा त्यांच्याविरोधात धनगर समाज तीव्र आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला.
निवेदनावर राजेंद्र शिखरे, केशव नाईक, अॅड. रवी शिंदे, किसन कोकरे, विलास वाईकर, तुकाराम ढोणे, दे- वराव करे, शिवम नाईक, यश कोकरे यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.