Deer poaching exposed in Hingoli; two arrested with 16 kg of meat and the hide
हिंगोली, पुढारी वृत्तसेवा सेनगाव तालुक्यातील धनगरवाडी शिवारातील एका शेतात हरिणाची शिकार करून मांस वाटून घेत असताना वन विभाग तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी छापा टाकला. या कारवाईत दोघांना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून १६ किलो मांस, हरिणाची कातडी तसेच जाळे जप्त करण्यात आले आहे.
हरिणाची शिकार होत असल्याची माहिती मिळताच वन विभागाने दहा दिवसांपासून पाळत ठेवली होती. रविवारी मांसाची वाटणी सुरू असल्याची माहिती मिळाली. यानंतर विभागीय वन अधिकारी डॉ. राजेंद्र नाळे, सहाय्यक वन अधिकारी सचिन माने, वनपरिक्षेत्र अधिकारी माधव केंद्रे तसेच गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप मोरे, जमादार साईनाथ कंठे, कुमार मगेर, सुभाष घुगे यांच्या संयुक्त पथकाने छापा टाकून दोघांना पकडले.
आणखी काहींचा सहभाग ?
या प्रकरणी वन्यजीव कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. या शिकारीत आणखी काही जणांचा सहभाग असल्याचा संशय असून, वन विभागाने ताब्यात घेतलेल्या दोघांची सखोल चौकशी सुरू केली आहे.