हिंगोली

Dattatray Bharne| नांदेडमध्ये 'काजू-बदाम', तर हिंगोलीत 'बेसन-भाकरी'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंकडून डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न?

हिंगोली जिल्ह्यात हिवरा जाटू शिवारामध्ये जमिनीवर बसून बेसन भाकरीचा घेतला आस्वाद

पुढारी वृत्तसेवा

हिंगोली : नांदेड येथील दुष्काळी आढावा बैठकीत काजू बदाम प्लेटच्या टीकेनंतर कृषिमंत्र्यासह लोकप्रतिनिधींनी हिंगोली जिल्ह्यात हिवरा जाटू शिवारामध्ये जमिनीवर बसून बेसन भाकरीचा आस्वाद घेतला. काजू-बदामावरील होणारी चर्चा डॅमेज कंट्रोल करण्यासाठी हा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.

नांदेड येथील दुष्काळ आढावा बैठकीत लोकप्रतिनिधींनी काजू-बदाम खाल्ले. त्यानंतर यावर तीव्र प्रतिक्रिया उंमटू लागल्या. वसमत तालुक्यातील टाकळगाव येथेच कृषिमंत्री भरणे यांचा ताफा आडवून त्यांना काजू बदाम ची प्लेट देण्याचा प्रयत्न झाला.

दरम्यान त्यानंतर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शनिवारी १९ सप्टेंबर रोजी औंढा नागनाथ तालुक्यातील हिवरा जाटू शेतशिवारात शेतातील पिकांची पाहणी केली आहे. कृषिमंत्र्यांच्या पाहणीदरम्यान शेतकऱ्यांनी हिंगोली जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा अशी मागणी केली. शेतकऱ्यांनी कृषीमंत्री भरणे यांच्यासमोर साहेब सर्वच शेतातील पीक गेले मुलीचे लग्न, मुलांचे शिक्षण कसे करणार, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करणार अशी व्यथा मांडली. सरकारकडून लवकरच शेतकऱ्यांना मदत दिली जाईल असे आश्वासन शेतकऱ्याला कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.

औंढा नागनाथ तालुक्यातील हिवरा जाटू येथील शेतकरी शंकर दत्तराव कऱ्हाळे यांच्या शेतातील सोयाबीन पिकाची पाहणी केल्यानंतर यांच्या शेतातील बांधावर बेसन भाकरी हिरव्या मिरच्याचा ठेचा असा जेवणाचा आस्वाद घेतला. यावेळी राज्यसभा खासदार रामराव वडकुते ,आमदार चंद्रकांत उर्फ राजू नवघरे, माजी जिल्हाध्यक्ष बि.डी बांगर, कृषी आयुक्त सुरेश मांढरे, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, तहसीलदार हरीश गाडे, नायब तहसीलदार प्रवीण ऋषी, शेतकरी किसन कहाळे प्रल्हाद कहाळे दत्तराव उघडे बापूराव उघडे तुकाराम शिंदे संतोष काळे माधव पंडित यांच्या सह शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

दरम्यान, संतप्त शेतकऱ्यांची भूमिका लक्षात घेता अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक श्यामकुमार डोंगरे , सहाय्यक पोलीस निरीक्षक आयुब शेख, पोलिस उपनिरीक्षक अमोल इंगोले पोलीस उपनिरीक्षक शेख खुदुस, पोलीस उपनिरीक्षक यशवंत गुरूपवार, संतोष पवार, रविकांत हरकाळ, किशोर पारीसकर, ज्ञानेश्वर सावळे, अमोल चव्हाण यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

नांदेड येथे दुष्काळी आढावा बैठकीनंतर काजू बदाम वरून सुरू असलेली टीका लक्षात घेता हिवरा जाटू येथे लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्याच्या शेतामध्ये बसून पिठलं भाकरीचा आस्वाद घेतला. हा प्रकार म्हणजे काजू बदामच्या टिकेचा डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया ही आता उमटू लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT