कळमनुरी : काँग्रेस पक्षाच्या वतीने शेतकरी, आदिवासी, अल्पसंख्याक व शेतमजुरांच्या न्याय हक्कांसाठी 9 मार्च रोजी सकाळी नऊ वाजता येथील लमानदेव यात्रा मैदानातून शेतकरी संघर्ष पदयात्रा काढण्यात आली. ही पदयात्रा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आली. पदयात्रेदरम्यान कार्यकर्त्यांनी विविध घोषणाबाजी करत शासनाचे लक्ष शेतकरी व सर्वसामान्यांच्या समस्यांकडे वेधण्याचा प्रयत्न केला.
या पदयात्रेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, ॲड. सचिन नाईक, साहेबराव कांबळे, डॉ. सतीश पाचपुते, सुधीर आप्पा सराफ, डॉ. रमेश शिंदे, ॲड. जकी कुरेशी, दत्तराव कदम, शेख बाबा, मोहम्मद परवेज, अख्तर पठाण, नितीन जिंतूरकर, भगवान खंदारे, सादत पठाण, बबलू पठाण, बबन डुकरे आदींची उपस्थिती होती.
पदयात्रा शिवनी खुर्द, उमरा, खानापूर चित्ता या गावांमधून जात असताना शेतकऱ्यांनी आपल्या विविध समस्या मांडल्या. या पदयात्रेद्वारे केंद्र सरकारने अमेरिकेसोबत केलेला करार रद्द करावा, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आदिवासींसाठी विशेष पदभरती करावी, शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा, घरकुल योजनेचा निधी लाभार्थ्यांच्या खात्यात तत्काळ जमा करावा, तसेच महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतील पांदण रस्ता, सिंचन विहीर व गोठे आदी कामे पुन्हा सुरू करावीत, अशा मागण्या करण्यात आल्या.
तसेच वनहक्क कायद्याची योग्य अंमलबजावणी करून वनपट्टीधारकांची नावे जमिनीवर करावीत, खरबीपासून पाणी वळविण्याचा प्रकल्प रद्द करावा, तसेच कळमनुरी तालुक्यातील रामवाडी-मुंढळ उपसा जलसिंचन योजनेला तत्काळ मंजुरी देऊन काम सुरू करावे, अशा मागण्याही करण्यात आल्या. या पदयात्रेत काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
काँग्रेसच्या वतीने काढण्यात आलेल्या हिंगोली ते कळमनुरी शेतकरी संघर्ष यात्रेमध्ये शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. या घोषणाबाजीने लक्ष वेधले होते. शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा, घरकुल योजनेचा निधी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावा यासह विविध मागण्या करण्यात आल्या.