औंढा नागनाथ: तालुक्यात सध्या बालकामगारांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे. हॉटेल, धाबे, आणि वीटभट्ट्यांपासून ते ऊसतोडणीपर्यंत अनेक धोकादायक कामांमध्ये अल्पवयीन मुले राबत असून, त्यांचे बालपण करपताना दिसत आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच शिरड शहापूर येथे एका अल्पवयीन कामगाराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाही, प्रशासनाकडून कोणतीही ठोस पावले उचलली जात नसल्याने संताप व्यक्त होत आहे.
तालुक्यातील हॉटेल, धाबे, किराणा दुकाने, छोटे-मोठे कटलरी व्यवसाय, लाईट-मंडप डेकोरेशन आणि चहाच्या टपऱ्यांवर बालकामगार मोठ्या प्रमाणावर काम करताना आढळत आहेत. याव्यतिरिक्त, कृषी क्षेत्रात ऊसतोडणीसाठी येणाऱ्या मजुरांमध्येही अल्पवयीन मुलांची संख्या मोठी आहे. मोढा परिसर आणि वीटभट्टी कारखान्यांमध्ये या मुलांकडून कष्टाची कामे करून घेतली जात आहेत.
बालकामगारांची शोधमोहीम राबवून त्यांच्या सुटकेची जबाबदारी महिला व बाल कल्याण अधिकारी कार्यालयाची आहे. मात्र, हा विभाग या गंभीर बाबीकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. विभागाकडून केवळ कागदावर तपासणीचे अहवाल सादर केले जात असून, प्रत्यक्षात बालकांची जीवघेणी पिळवणूक सुरूच आहे. शिरड शहापूरमधील मृत्यूच्या घटनेने या प्रश्नाची भीषणता समोर आणली असली, तरी संबंधित यंत्रणा अद्याप 'वेट अँड वॉच'च्या भूमिकेत दिसत आहे.
बालकामगार ठेवणे हा कायद्याने गुन्हा असतानाही, औंढा तालुक्यात हा व्यवसाय खुलेआम सुरू आहे. प्रशासनाने तातडीने विशेष पथके नेमून संपूर्ण तालुक्यात तपासणी मोहीम राबवावी आणि बालकामगार ठेवणाऱ्या मालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी आग्रही मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.