लोकअदालतीत साडेपाच कोटींची प्रकरणे निकाली file photo
हिंगोली

लोकअदालतीत साडेपाच कोटींची प्रकरणे निकाली

पीडित कुटुंबांना मिळाले नुकसान भरपाईचे धनादेश

पुढारी वृत्तसेवा

Cases worth ₹5.5 crore resolved at Lok Adalat.

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : येथील तालुका विधी सेवा समितीच्या वतीने सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय मुंबई तसेच जिल्हा न्यायालय परभणी व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणी यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली येथील न्यायालयात १४ मार्च रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या राष्ट्रीय लोकअदालतीचे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश टी. एस. अकाली यांच्या हस्ते झाले.

यावेळी जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अॅड. श्रीधर आर. घुगे, सचिव अॅड. मिलींद कांबळे तसेच जिल्हा वकील संघाचे पदाधिकारी व विधीज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या लोकन्यायालयात प्रलंबित असलेली ५०१ प्रकरणे तसेच महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण कंपनी, विविध बँका, ग्रामपंचायत व नगरपालिका यांची वाद दाखलपूर्व ३ हजार ६२७ प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती.

त्यापैकी प्रलंबित १२८ प्रकरणे व दाखलपूर्व ३ प्रकरणे अशी एकूण १३१ प्रकरणे निकाली काढण्यात आली. या लोकअदालतीत प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांमध्ये तडजोडीच्या आधारे एकूण ५ कोटी ५८ लाख ९१ हजार ६५३ रुपये इतक्या रकमेवर समझोता करण्यात येऊन संबंधित प्रकरणे निकाली काढण्यात आली.

या लोकन्यायालयासाठी हिंगोली येथील न्यायिक अधिकारी व विधीज्ञ यांचा समावेश असलेली एकूण सहा पॅनल गठीत करण्यात आली होती. या पॅनलचे प्रमुख म्हणून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष टी. एस. अकाली यांच्या मार्गदर्शनाखाली एस.एन. माने-गाडेकर, आर. एस. रोटे, पी. जी. महाळंकर, पी. आर. पमनानी, डी. व्ही. भंडारी, एस. एस. पळसुळे यांनी कामकाज पाहिले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश टी. एस. अकाली यांनी पुढील ९ मे रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय लोकन्यायालयात जास्तीत जास्त प्रकरणे ठेवून ती तडजोडीने निकाली काढावीत, असे आवाहन करण्यात आले.

लोकन्यायालयात एक वर्षापूर्वी झालेल्या अपघातात समरजितसिंग रघुवंशी यांचे निधन झाले होते. त्यांच्या पत्नी आरती रघुवंशी यांनी नुकसान भरपाईसाठी जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. सदर प्रकरण तडजोडीने निकाली निघून लिबर्टी जनरल इन्शुरन्स कंपनीकडून त्यांना ५७ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे निश्चित करण्यात आले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश टी. एस. अकाली यांच्या हस्ते त्यांना धनादेश प्रदान करण्यात आला. हे प्रकरण आर. एस. रोटे यांच्या पॅनलवर निकाली काढण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT