हिंगोली

भोकरच्या पत्रिकेमध्ये अमरनाथ राजूरकरांचे नाव : आ. हेमंत पाटील यांना डावलले

हे दोन्ही कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रत्येक बाबतीत अध्यक्ष खतगावकर यांनी लक्ष घातले आहे

पुढारी वृत्तसेवा

विशेष प्रतिनिधी

नांदेड : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी पुढील दोन दिवसांत भोकर आणि बिलोली येथील बँक शाखांच्या नव्या इमारतींच्या उद्घाटनाचा बार उडवला जात आहे. विशेष म्हणजे भोकर शाखेच्या उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्षस्थान खा. अशोक चव्हाण भूषविणार असून बिलोलीतील अशाच सोहळ्याचे अध्यक्षस्थान बँक अध्यक्ष भास्करराव खतगावकर यांनी स्वतःकडे ठेवले आहे.

आपल्या स्थापनेची शताब्दी पार केलेल्या या बँकेच्या जिल्हाभरात ६३ शाखा असून त्यापैकी केवळ ११ शाखा मालकीच्या जागेमध्ये आहेत. भोकर शाखा नव्या इमारतीत आधीच सुरू झाली असून या तसेच बिलोली शाखेच्या इमारतीचे उद्घाटन सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. हे दोन्ही कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रत्येक बाबतीत अध्यक्ष खतगावकर यांनी लक्ष घातले आहे.

जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची मुदत ३ एप्रिल रोजी संपली; पण शासनाच्या आदेश न आल्यामुळे 'काळजीवाहू कारभारी' या नात्याने संचालक मंडळ बँकेच्या कामकाजावर नियंत्रण ठेवून आहे. अध्यक्ष खतगावकर यांच्यासह ८ विद्यमान संचालक कायद्यातील नव्या तरतुदीमुळे पुढील निवडणूक लढवू शकणार नसल्यामुळे त्यांच्या कार्यकाळातील शेवटचे दोन मोठे कार्यक्रम म्हणून भोकर व बिलोलीच्या सोहळ्याकडे बघितले जात आहे.

आ. हेमंत पाटील बेदखल

भोकर शाखा इमारतीच्या लोकार्पण सोहळ्याची पत्रिका समाजमाध्यमांत जारी झाली असून जिल्ह्यातील एकमेव विधान परिषद सदस्य हेमंत श्रीराम पाटील यांना बेदखल करत आमदार अमरनाथ राजूरकर यांचे नाव प्रमुख पाहुण्यांमध्ये टाकण्यात आले आहे. भोकरमधील दोन संचालकांस 'विनीत'मध्ये ढकलण्यात आल्याबद्दल बाळासाहेब रावणगावकर यांनी खेद व्यक्त केला.

विद्यमान संचालक मंडळाच्या ५ वर्षांच्या कार्यकाळामध्ये बँकेचा मागील संपूर्ण संचित तोटा भरून निघाला, हे त्यांचे मोठे यश मानले जात असताना, बँकेतील नोकरभरतीची प्रक्रिया पूर्ण करण्यात या मंडळाला यश आले नाही. भरतीसंदर्भातील प्राथमिक प्रक्रियेमध्ये 'प्रतापच प्रताप' घडल्यामुळे शासनाने भरतीला स्थगिती दिली. ती अद्याप कायम आहे.

भोकर शाखेच्या इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यासाठी खा. अशोक चव्हाण यांना आमंत्रित करण्यासाठी तसेच त्यांना या सोहळ्याचे अध्यक्षपद देण्यासाठी स्वतः भास्करराव खतगावकर यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. पण ही बाब बँकेतील काही संचालकांना रुचली नाही, तरी त्यांना उघड विरोध करता आला नाही. खा. चव्हाण यांच्या सोयीनुसार २४ तारीख ठरविण्यात आली; पण २५ तारखेच्या बिलोली येथील कार्यक्रमास खा. चव्हाण उपस्थित राहणार नसल्याचे सांगण्यात आले.

खा. रवींद्र चव्हाण, राज्यसभा सदस्य अजित गोपछडे, आ. प्रताप पाटील चिखलीकर, खा. नागेश पाटील आष्टीकर, आ. श्रीजया चव्हाण प्रभृतींसह नांदेड भाजपाचे अध्यक्ष अमरनाथ राजूरकर यांचेही नाव भोकरच्या कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितांत झळकल्यामुळे वादाची ठिणगी पडली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT