Aundha Nagnath Nagar Panchayat issues
औंढा नागनाथ : औंढा नागनाथ नगरपंचायतीच्या कारभाराबाबत दिवसेंदिवस साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. नुकतीच 'दैनिक पुढारी'मध्ये 'मंदिराचे पावित्र्य धोक्यात' या मथळ्याखाली आलेल्या वृत्ताची दखल घेऊन खांडेश्वरी मंदिरासमोरील टाकलेल्या कचरा उचलण्याबाबत सारवासारव केल्याचा प्रकार समोर आला आहे. पण कायमस्वरूपी प्रश्न मिटवला जात नाही.
तर दुसरीकडे आहे त्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना गेल्या दोन वर्षांपासून पगार मिळत नसल्यामुळे नगरपंचायतचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांवर मात्र उपासमारीची वेळ आली आहे. गावातील सर्वत्र घाण पाणी पावसाळ्यात तीर्थक्षेत्र आठवे ज्योतिर्लिंग नागेश्वर नागनाथ मंदिर परिसरात येते, याबाबत नागनाथ संस्थानकडून नगरपंचायतीला कित्येकदा पत्रव्यवहार करण्यात आला.
परंतु, नगरपंचायतीकडून अद्यापही याबाबत कुठलीही उपाययोजना करण्यात आली नाही. गावातील नाले कचऱ्यामुळे तुडुंब भरल्याने दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर येत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सोबतच पावसाळाभर नागेश्वर नागनाथाचे मंदिर सुद्धा घाणीच्या विळख्यातच असते. यामुळे भाविक, पर्यटक, संस्था कर्मचारी, पदाधिकारी आणि पुजारी वर्गास नाहक या घाणीच्या त्रासाला सामोरे जावे लागते.
महामार्गावरील खांडेश्वरी समोर गावातील कचरा जमा होत असल्याने नगरपंचायतीच्या नियोजन शून्य कारभारामुळे परिसरात सुद्धा घाणीचे वास्तव्य निर्माण झाले. याबाबतचे वृत्त सर्वत्र प्रकाशित होताच नगरपंचायतीने तात्पुरती मलमपट्टी करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नाही. महामार्गावर आहे तीच परिस्थिती असल्यामुळे नगरपंचायतीकडून फक्त सारवा सरव केली जात असल्याने प्रशासनावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.