Jyotirlinga Temple Development Pudhari
हिंगोली

Aundha Nagnath Temple | औंढा नागनाथ मंदिराच्या सर्वांगीण विकासाला गती; १८२ कोटींच्या आराखड्यास उच्चाधिकार समितीची मंजुरी

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या विशेष प्रयत्नांना यश

पुढारी वृत्तसेवा

Jyotirlinga Temple Development

औंढा नागनाथ | देशातील आठवे ज्योतिर्लिंग आणि प्रसिद्ध नागेश्वर नागनाथ क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औंढा नागनाथ मंदिराच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. सोमवारी (दि. २२) मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत मंदिर विकासासाठी तयार करण्यात आलेल्या १८२ कोटी रुपयांच्या सुधारित आराखड्यास तत्त्वतः मंजुरी देण्यात आली.

मंजूर निधीपैकी १०६ कोटी रुपये मंदिर परिसरातील विकासकामांसाठी, तर ७६ कोटी रुपये पुरातत्त्व विभागामार्फत करण्यात येणाऱ्या संवर्धन आणि विकास कामांसाठी खर्च करण्यात येणार आहेत.

औंढा नागनाथ हे देशातील महत्त्वाचे ज्योतिर्लिंग क्षेत्र असून येथे दरवर्षी महाशिवरात्रीच्या निमित्ताने भव्य यात्रा भरते. यात्रेदरम्यान होणारा रथोत्सव हा भाविकांसाठी प्रमुख आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. तसेच श्रावण महिन्यात आणि नागपंचमीच्या दिवशी हजारो भाविक, भजनी मंडळी व पर्यटक दर्शनासाठी येथे दाखल होतात. देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांच्या तुलनेत आवश्यक सुविधा अपुऱ्या असल्याने परिसराच्या विकासाची मागणी सातत्याने होत होती.

मंदिर व परिसराच्या विकासासाठी जिल्हा प्रशासनाने सुरुवातीला २६६ कोटी रुपयांचा आराखडा तयार केला होता. त्यानंतर सुधारित स्वरूपात ४४५ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला. उच्चाधिकार समितीने काही सुधारणा सुचविल्यानंतर नव्याने आराखडा सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी विशेष पुढाकार घेत नियोजन विभागाच्या माध्यमातून १०६ कोटी आणि पुरातत्त्व विभागासाठी ७६ कोटी रुपयांचा स्वतंत्र आराखडा तयार केला.

मुख्य सचिवांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सविस्तर सादरीकरण केले. यावेळी पुरातत्त्व विभागाचे अधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, जिल्हा नियोजन अधिकारी अनिता लव्हारे तसेच जिल्हा सहाय्यक नियोजन अधिकारी गंगाधर चितळे उपस्थित होते. समितीने या आराखड्यास तत्त्वतः मान्यता दिली असून आता तो शिखर समितीसमोर अंतिम मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे.

अंतिम मंजुरीनंतर विविध विकासकामांना प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. यामध्ये आधुनिक दर्शन मंडप, कार्यालय आणि पास केंद्रासाठी १४.१८ कोटी रुपये, मंदिर परिसरात दगडी फरशी बसविण्यासाठी १५.०६ कोटी रुपये, उत्तर बाजूस व्हीआयपी दर्शन बारीसाठी ४.८९ कोटी रुपये, सुरक्षा भिंतीसाठी २.६० कोटी रुपये, अग्निसुरक्षा व्यवस्थेसाठी २.७५ कोटी रुपये तसेच मुख्य प्रवेशद्वार आणि सुरक्षा व्यवस्थेसाठी १.५० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. भाविकांना तत्काळ माहिती व पोलिस मदत उपलब्ध व्हावी यासाठी २.६३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

या विकास आराखड्याच्या अंमलबजावणीनंतर औंढा नागनाथ मंदिर परिसरात भाविक, भक्त आणि पर्यटकांसाठी आधुनिक व दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार असून या ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळाचा सर्वांगीण कायापालट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT