हिंगोली

Hingoli accident | औंढा नागनाथ ते जवळा बाजार रोडवर बस व मोटरसायकलचा भीषण अपघात; तरुण जागीच ठार

मोटारसायकलवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला

पुढारी वृत्तसेवा

औंढा नागनाथ: तालुक्यातील जवळा बाजार येथील कपिलेश्वर साखर कारखाना परिसरात आज (दि. २१) सकाळी ११:२० वाजता झालेल्या भीषण अपघातात एका २५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. गजानन दत्तराव कदम (रा. वगरवाडी, ता. औंढा नागनाथ) असे मयत तरुणाचे नाव आहे.

अपघाताचा घटनाक्रम

गजानन कदम हे आपली मोटारसायकल (क्रमांक MH-38-U-1257) घेऊन जवळा बाजारकडून वगरवाडीकडे (स्वतःच्या गावी) जात होते. कपिलेश्वर साखर कारखान्याजवळ आले असता, त्यांचे मोटारसायकलवरील नियंत्रण सुटले. त्याच वेळी समोरून औंढा नागनाथकडून येणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसला (क्रमांक MH-06-S-8775) त्यांनी जोरदार धडक दिली. या अपघातात डोक्याला, छातीला आणि पायाला गंभीर दुखापत झाल्यामुळे गजानन यांचा घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाला.

पोलीस आणि प्रशासनाची कारवाई

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक श्यामकुमार डोंगरे, जवळा बाजार पोलीस चौकीचे इम्रान सिद्दिकी आणि त्यांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मयताचा मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी जवळा बाजार येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. तसेच, राज्य महामार्ग पोलिसांचे एएसआय खतीब, कर्मचारी आडे आणि कदम यांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक कोंडी सुरळीत केली.

गावावर शोककळा

मृत गजानन कदम हे वगरवाडी गावचे माजी सरपंच यांचे सुपुत्र होते. त्यांच्या निधनामुळे वगरवाडी गावात मोठी शोककळा पसरली आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीही वगरवाडी गावच्या चार ते पाच तरुणांचा अपघाती मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT