Ajit Pawar Gunja village visit
वसमत : उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी वसमत दौऱ्यावर असताना त्यांनी गुंज येथील ट्रॅक्टर अपघातातील महिलांच्या कुटुंबीयांना भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. तसेच सात कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांच्या धनादेशाचे वाटप केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यास वसमत दौऱ्यावर होते. यावेळी सायंकाळी साडेसहा वाजता तालुक्यातील गुंज येथे ट्रॅक्टर अपघातातील महिलांच्या कुटुंबीयांना भेट दिली. व त्यांच्या कुटुंबीयांशी चर्चा करून अडीअडचणी जाणून घेतल्या.
यावेळी मुख्यमंत्र्यांकडून जाहीर करण्यात आलेल्या सात कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांच्या धनादेशाचे वाटप यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच पीडित कुटुंबांना घरकुल योजनेतून घर मिळवून द्यावे आणि त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तहसीलदार शारदा दळवी यांना दिले.
यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, नवाब मलिक, आमदार राजू पाटील नवघरे, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, तहसीलदार शारदा दळवी यांच्यासह महसूल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
गुंज येथील महिला शेतमजुरांचा दि. ४ एप्रिल २०२५ रोजी आलेगाव येथील दगडोजी लक्ष्मण शिंदे यांच्या शेतात शेतकामासाठी जात असताना ट्रॅक्टर ट्रॉलीसहीत विहिरीत पडून मृत्यू झाला. त्यामध्ये १) ताराबाई सटवाजी जाधव (३५), धुरपता सटवाजी जाधव (१८) सिमा (सिमरन) संतोष कांबळे (१८), सरस्वती लखन बुरड (२५), चऊतराबाई माधव पारधे (४५), मिना तुकाराम राऊत (२५) आणि ज्योती इरबाजी सरोदे (३०) यांचा समावेश होता. उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते आज सातही मयतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लक्ष रुपयांचा धनादेश वितरीत करण्यात आला.