आखाडा बाळापूर; पुढारी वृत्तसेवा : कळमनुरी तालुक्यातील हिंगोली-नांदेड महामार्गावर कुर्तडी शिवारामध्ये बोलेरो आणि दुचाकीचा भिषण अपघात झाला. शनिवार (२३मार्च) सायंकाळी ७.३० वाजताच्या दरम्यान हा अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी आहे.
हिंगोली-नांदेड महामार्गावर कुर्तडी शिवारात शनिवारी (२३ मार्च) सायंकाळी साडेसात वाजता बोलेरो (एम एच १२ व्हीसी ८०१४) व दुचाकीचा (एम एच ०६ बी क्यू ९८४३) भीषण अपघात झाला. यामध्ये राहुल उर्फ सुरज दत्तराव भालेराव (वय २८ वर्ष रा. भोसी ता. कळमनुरी) व श्याम शंकरराव देवकते (वय २५ वर्ष रा. भोसी ता. कळमनुरी) हे दोघेजण दुचाकीने वारंगा फाटाकडे जात होते. या दुचाकीचा हिंगोलीकडून येणाऱ्या बोलेरो गाडीसोबत अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार राहुल भालेराव याचा जागी मृत्यू झाला तर श्याम शंकरराव देवकते हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी वारंगा फाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. चार चाकी बोलेरो वाहन चालक फरार आहे. या घटनेची माहिती मिळताच आखाडा बाळापूर स.पो.नि. सुनील गोपींनवार व वारंगा फाटा पोलीस घटनास्थळी दाखल झाले.