हिंगोली : वसमत ते नांदेड मार्गावर आसेगाव शिवारात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका तरुणाला गावठी पिस्टलसह पकडले आहे. या प्रकरणी वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल झाला आहे.
यामध्ये अन्य एकाचा शोध सुरू असून त्यासाठी पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले आहे. मागील काही दिवसांत शस्त्र बाळगणाऱ्यांची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाईची धडक मोहिम हाती घेण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, जमादार आकाश टापरे, आझम प्यारेवाले, हरीभाऊ गुंजकर, नितीन गोरे, साईनाथ कंठे, नरेंद्र साळवे यांचे पथकही स्थापन केले आहे.
दरम्यान, वसमत ते नांदेड मार्गावर आसेगाव शिवारात नांदेड येथील एक तरुण गावठी पिस्टल विक्रीसाठी आल्याची माहिती यापथकाला मिळाली होती. त्यावरून या पथकाने शुक्रवारी सायंकाळी साध्या वेशात आसेगाव शिवार गाठले. त्या ठिकाणी पथकाने माहिती घेत एका तरुणाला ताब्यात घेतले त्याची झडती घेतली असता त्याच्या कडे गावठी पिस्टल आढळून आले असून त्याची किंमत ४० हजार रुपये आहे. अधिक चौकशीत त्याने त्याचे नांव सुरज पाटील (रा. कवठा, ता. नांदेड) असे सांगितले. तर पवन पुयड याने हे पिस्टल विक्रीसाठी दिल्याची माहितीही पोलिसांना दिली.