65 brass sand seized by tehsil team in two days
सेनगाव, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील वाळू माफीयांविरुध्द तहसील प्रशासनाने दंड थोपटले असून मागील दोन दिवसांत तब्बल ६५ ब्रास वाळूसाठा जप्त केला असून वाळू वाहतुक करणारे दोन टिप्पर पकडले आहेत. या प्रकरणी पुढील कारवाई केली जात असल्याचे महसूल विभागाच्या सुत्रांनी सांगितले.
सेनगाव तालुक्यात मागील काही दिवसांपासून वाळू माफीय सक्रिय झाले होते. रात्रीच्या वेळी बाळू उपसा करून त्याची वाहतूक केली जात होती. वाळू उपसा व वाहतूक रोखण्यासाठी पथके स्थापन करण्यात आली होती. मात्र या पथकालाही वाळू माफीया हुलकावणी देऊन लागले होते.
विशेषतः बन, बरडा, ब्रम्हवाडी या शिवारातून मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा व वाहतूक होत होती. दरम्यान, सेनगाव तालुक्यातून होणारा वाळू उपसा रोखण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी तहसील प्रशासनाला कडक सूचना दिल्या होत्या. त्यावरून तहसीलदार सखाराम मांडवगडे, नायब तहसीलदार दे वराव कारगुडे, मंडळ अधिकारी दंडीमे, ग्राम महसूल अधिकारी प्रदीप इंगोले, रवी इंगोले, नामदेव ढोले, संतोष इंगळे, राऊत, मिलींद गरपाळ, गिरी, आर. एस. सावंत यांच्या पथकाने मागील दोन दिवसांपासून वाहनांची तपासणी मोहिम हाती घेतली होती, रात्रीच्या वेळी वाळू घाटावरून येणाऱ्या वाहनांची तपासणी केली.
त्यामध्ये दोन टिप्पर वाळू वाहतूक करतांना पकडले आहेत. या शिवाय ब्रम्हवाडी शिवारात ३० ब्रास, कडोळी शिव-ारात १० ब्रास तर इतर ठिकामी २५ ब्रास असा ६५ ब्रास वाळू साठाही जप्त केला आहे. सदर वाळूसाठा ग्रामपंचायतीच्या ताब्यात देण्यात आला असून दोन टिप्पर सेनगाव पोलिस ठाण्यात आणण्यात आले आहेत. या प्रकरणी पुढील कारवाई केली जात असल्याचे तहसील प्रशासनाच्या सुत्रांनी सांगितले.