4,000 youths to participate in this year's Pandharpur cycle wari
हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : राज्यातून पंढरपूर सायकलवारीला सोमवारपासून सुरवात होणार असून यावर्षी तब्बल 4 हजारपेक्षा अधिक सायकलस्वार या वारीमध्ये सहभागी होणार आहेत. त्यामुळे मागील पाच वर्षापासून सुरु असलेली सायकलवारीची परंपरा यावर्षीही कामय राहणार असून सायकलद्वारे आरोग्य राखण्यासोबत वारीतून भक्तीचा संदेश याद्वारे दिला जाणार आहे.
राज्यात सायकल संघटनेच्या वतीने मागील पाच वर्षापासून आषाढी एकादशी निमित्त सायकलवारी केली जाते. राज्यभरातील सायकलस्वार या वारीमध्ये सहभागी होतात. सायकलद्वारे केलेल्या वारीतून आरोग्यासाठी सायकल चालविण्याचे महत्व पटवून दिले जात असून वारीतून भक्तीचा संदेश दिला जात आहे.
विशेष म्हणजे या वारीतून सायकल रिंगण सोहळा देखील पार पडतो. त्यानुसार यावर्षी राज्यभरातील सायकलस्वारांचे 129 ग्रुप तयार करण्यात आले असून त्यातून सुमारे 4 हजार सायकलस्वार सहभागी झाले आहेत. प्रत्येक जिल्ह्यातून सायकल ग्रुपने त्यांच्या जिल्हयातून सायकलवारीसाठी निघण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार सर्व आवश्यक व्यवस्था देखील तयार करण्यात आली आहे. या सायकलवारीला सोमवारपासून सुरवात होणार आहे.
राज्यभरातील सायकलस्वार वारीला निघणार आहेत. सुमारे 4 हजार पेक्षा अधिक सायकलस्वार सहभागी होणार आहेत. पंढरपूर येथे पोहोचण्याचे अंतर लक्षात घेऊन सायकलस्वार त्यानुसार वारीला निघणार असून सामान्यतः 8 ते 11 जुलैपर्यंत सायकलवारीचा पंढरपूरपर्यंत प्रवास असणार आहे.
11 जुलै रोजी सर्व सायकलस्वार पंढरपूर येथे पोहोचल्यानंतर नगर प्रदक्षिणा घेतली जाणार आहे. त्यानंतर 12 जुलै रोजी पंढरपूर येथील रेल्वे मैदानावर नेत्रदीपक सायकल रिंगण सोहळा पार पडणार आहे. त्यानंतर वारीतील सायकलस्वार विठुरायाचे दर्शन घेऊन परतीच्या मार्गाला निघणार आहेत.
भक्ती, आरोग्याचा संगम
नागपूर येथील सायकलस्वार वारीसाठी निघाले आहेत. तर आता इतर जिल्हयातील सायकलस्वार निघणार आहेत. हिंगोली येथील सायकल वारकरी 9 जुलै रोजी निघणार आहेत. औंढा नागनाथ, परभणी, गंगाखेड, परभणी, येरमाळा, बार्शी मार्गे पंढरपूर येथे पोहोचणार असल्याची माहिती हिंगोली जिल्हा सायकल संघटनेचे अध्यक्ष प्रविण काळबंडे यांनी दिली.