Hingoli Earthquake : हिंगोलीत भूकंपाचे २ धक्के, प्रशासन सतर्क, जीवित अथवा वित्तहानी नाही file photo
हिंगोली

Hingoli Earthquake : हिंगोलीत भूकंपाचे २ धक्के, प्रशासन सतर्क, जीवित अथवा वित्तहानी नाही

जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरू नये – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

पुढारी वृत्तसेवा

2 earthquakes in Hingoli, administration on alert, no loss of life or money

हिंगोली : पुढारी वृत्तसेवा हिंगोली जिल्ह्यात आज सकाळी भूकंपाचे दोन धक्के जाणवले. वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे परिसरात सकाळी ९.४३ वाजता ४.५ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली. यापूर्वी सकाळी ७.४६ वाजता ३.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा सौम्य धक्का जाणवला. या दोन्ही घटनांमध्ये प्राथमिक माहितीनुसार जिल्ह्यात कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झालेली नाही.

भूकंपाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने परिस्थितीचा आढावा घेतला असून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेसह संबंधित सर्व विभागांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. भूकंपाचे धक्के जाणवल्यास नागरिकांनी घाबरून न जाता सुरक्षित ठिकाणी जावे. इमारती, विद्युत खांब आणि इतर धोकादायक ठिकाणांपासून दूर राहावे. तसेच प्रशासनाकडून मिळणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष राहुल गुप्ता यांनी केले आहे.

भूकंपाबाबत सोशल मीडिया किंवा अन्य माध्यमांतून प्रसारित होणाऱ्या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. कोणतीही माहिती मिळाल्यास तिची खात्री अधिकृत शासकीय माध्यमांद्वारे करावी. नागरिकांनी शांतता राखून प्रशासनाला सहकार्य करावे, असेही जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आवाहन केले आहे.

प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे

भूकंपामुळे कोणत्याही घराचे, इमारतीचे किंवा अन्य मालमत्तेचे नुकसान झाल्याची माहिती प्राप्त झाल्यास संबंधित यंत्रणांनी प्रत्यक्ष पाहणी करून तातडीने पंचनामे करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. गावपातळीवरही परिस्थितीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत, असेही राहुल गुप्ता यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT