भिमराव बोखारे
वसमत : माझं वय अवघं 15 वर्षे आहे, पण घरच्यांनी माझं लग्न 25 वर्षांच्या तरुणासोबत ठरवलंय. मला आता लग्न करायचं नाही, मला खूप शिकायचंय..! ही काळजाचा थरकाप उडवणारी आर्त साद आहे वसमत तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीची.
स्वतःचा बालविवाह रोखण्यासाठी या मुलीने दाखवलेल्या धाडसामुळे प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली असून, हा विवाह रोखण्यासाठी आता युद्धपातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत.
वसमत तालुक्यातील एका गावात इयत्ता दहावीत शिकणाऱ्या या 15 वर्षीय विद्यार्थिनीचे लग्न तिच्या पालकांनी फेब्रुवारी महिन्यात निश्चित केले होते. नवरदेव 25 वर्षांचा तरुण आहे. मुलगी अल्पवयीन असताना आणि तिची शिकण्याची प्रचंड जिद्द असतानाही, कुटुंबीयांनी तिच्या मनाविरुद्ध हा संसार थाटण्याचा घाट घातला होता. मात्र, या अन्यायाविरुद्ध गप्प न बसता, त्या मुलीने विलक्षण धाडस दाखवले. तिने थेट शाळेचे मुख्याध्यापकांस गाठून आपली कैफियत मांडली आणि शिक्षणाची संधी देण्याची विनंती लेखी स्वरूपात केली.
विद्यार्थिनीच्या या अर्जाची मुख्याध्यापकांनी अत्यंत गांभीर्याने दखल घेतली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता ग्रामपंचायत कार्यालय गाठून ग्रामविकास अधिकाऱ्यांना या गंभीर प्रकाराची माहिती दिली. तसेच, हा बालविवाह रोखण्यासाठी आणि संबंधित पालकांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी लेखी पत्रही दिले. या पत्रानंतर ग्रामपंचायत प्रशासन ॲक्शन मोडवर आले असून, विवाह रोखण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
पालकांचे होणार समुपदेशन
बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार 18 वर्षांखालील मुलीचे लग्न लावणे हा गंभीर गुन्हा आहे. प्रशासनाकडून आता संबंधित मुलीच्या पालकांचे समुपदेशन करण्यात येणार आहे. बालविवाहाचे दुष्परिणाम आणि मुलीच्या शिक्षणाचे महत्त्व पालकांना पटवून देऊन हा विवाह रद्द करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. प्रशासन या धाडसी मुलीचे शिक्षण खंडित होऊ देणार नाही आणि हा बालविवाह रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल, अशी ग्वाही देण्यात आली आहे.