हिंगोली : लोकन्यायालयामध्ये १२८ प्रकरणे निकाली pudhari photo
हिंगोली

हिंगोली : लोकन्यायालयामध्ये १२८ प्रकरणे निकाली

पुढारी वृत्तसेवा

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : येथील तालुका विधी सेवा समिती, सर्वोच्च न्यायालय तसेच मुंबई उच्च न्यायालय व परभणी जिल्हा न्यायालय तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली न्यायालयामध्ये शनिवारी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोकन्यायालयामध्ये प्रलंबित असलेली ११३० प्रकरणे तसेच विद्युत महावितरण कंपनी, विविध बँका, ग्रामपंचायत व नगरपालिका यांची वाद दाखलपूर्व ३०९० प्रकरणे तडजोडीसाठी लोकअदालतीमध्ये ठेवण्यात आली होती.

या लोकअदालतीमध्ये प्रलंबित १०८ व वाद दाखलपूर्व २० असे एकूण १२८ प्रकरणे निकाली काढण्यात आली. या लोकन्यायालयात तडजोडी आधारे प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणात तब्बल २ कोटी ३५ लाख ४८ हजार १७५ रुपयांची प्रकरणे निकाली काढण्यात आले.

या लोकन्यायालयासाठी हिंगोली येथे न्यायिक अधिकारी तसेच विधीज्ञ समाविष्ट असलेली पाच पॅनल तयार करण्यात आले होते. या लोकअदालतीमध्ये जिल्हा न्यायाधीश-१ तथा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष आर. व्ही. लोखंडे यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा न्यायाधीश- १ आर. व्ही लोखंडे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१ पी. जी. देशमुख, सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर व्ही. व्ही. सावरकर, दुसरे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आय. जे. ठाकरे, तिसरे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर पी. आर. पमनानी यांनी पॅनल प्रमुख म्हणून काम केले. या लोकअदालतीला वकील संघाचे अध्यक्ष अॅड. शिवशंकर साबळे, सचिव अॅड. अजय वानरखेडे, वकील संघाचे सर्व सभासद, न्यायालयीन व पोलीस कर्मचारी यांनी सहकार्य केले.

या लोकन्यायालयामध्ये पुजा नागनाथराव पोतदार वय २२ वर्षे या तरूणीचा ४ नोव्हेंबर, २०१९ रोजी अकोला बायपास टी पॉईन्ट येथे झालेल्या स्कुटी व ट्रकच्या अपघातात तिचा एक पाय कायमचा गमावला होता. त्यामुळे तिला चालता येत नाही. वरील मजल्यावर पोहचणे शक्य होत नसल्याने हिंगोली जिल्हा न्यायालयामधील जिल्हा न्यायाधीश आर. व्ही. लोखंडे व तदर्थ जिल्हा न्यायाधीश पी.जी. देशमुख यांनी स्वतः पॅनलवरुन खाली उतरुन जिल्हा न्यायालयाच्या इमारती समोरील आवारात उभ्या असलेल्या वाहनामध्ये बसलेल्या पूजा नागनाथराव पोतदार या दिव्यांग तरुणीच्या जवळ जाऊन त्यांची बाजू ऐकूण घेतली. तसेच त्या प्रकरणामधे २० लाख नुकसान भरपाई रकमेवर तडजोड करून प्रकरण निकाली काढण्यात आले. अर्जदार पुजा नागनाथराव पोतदार हिची बाजु अॅड. एस. बी. गडदे यांनी मांडली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT