हिंगोली; पुढारी वृत्तसेवा : शेतकर्यांच्या शेतातील तसेच कॅनॉलवर लावण्यात येणार्या मोटारीसह शाळेतील साहित्य चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी (दि.२९) रात्री या टोळीला जेरबंद केले. चोरट्यांकडून मोटारपंपासह शाळेतील टीव्ही व मोटारसायकल असा एकूण ८० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. विशेष म्हणजे आरोपींनी दहा वर्षांपूर्वी केलेल्या गुन्ह्याची कबुलीही देण्यात आली आहे.
मागील काही महिनाभरापासून शेतातील कृषी पंप चोरीला जात असल्याच्या घटना घडत होत्या. त्यामुळे शेतकर्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. विशेष म्हणजे आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात मोटार चोरीचे अनेक गुन्हे दाखल झाले होते. हा प्रकार लक्षात घेऊन पोलीस अधिक्षक जी श्रीधर यांनी सदरील गुन्ह्याचा छडा लावण्याचे निर्देश स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंडीत कच्छवे यांना दिल्या होत्या. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे यांचे पथक नेमण्यात आले होते.
शनिवारी (दि. २९) गोपनीय माहितीनुसार कळमनुरी तालुक्यातील येहळेगाव तुकाराम येथील विक्रम उर्फ बंटी दत्तराव काळे, ज्ञानेश्वर भिमराव काळे, संकेत पुंजाराम कवाने यांना ताब्यात घेवून विचारपूस केली असता त्यांनी फरार आरोपी तिरूपती उर्फ बाळु किसन जानकर, आकाश मेटकर, गजानन धोंडबाराव पतंगे यांच्यासोबत मिळून मोटारपंप चोरी केल्याची कबुली दिली.
या आरोपींना विश्वासात घेऊन अधिक तपास केला असता त्यांनी दहा वर्षापुर्वी शाळा फोडल्याची कबुली दिली. पोलीसांनी गुन्हयातील गेलेला मोटारपंप व शाळेतील टीव्ही व मोटारसायकल असा एकूण 80 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलीस अधिक्षक जी श्रीधर, अप्पर पोलीस अधिक्षक अर्चना पाटील, पोलीस निरीक्षक पंडीत कच्छवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे, शेख बाबर, विठ्ठल कोळेकर, गणेश लेकुळे, आकाश टापरे, नरेंद्र सावळे, तुषार ठाकरे यांच्या पथकाने केली.