हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : औंढा नागनाथ तालुक्यातील येडूद येथील विठ्ठल कदम या शेतकर्याने आपल्या शेतात जवळपास एक एकर क्षेत्रावर काकडीची लागवड केली होती. परंतू, पंधरा दिवसांपुर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतातील काकडीचे पिक उद्धवस्त झाले. पावसामुळे नुकसान झालेल्या पिकाचा पंचनामा करण्यासाठी महसूल विभागाचे कर्मचारी आज येतील, उद्या येतील अशी आशा होती. परंतू, पंधरा दिवस उलटले तरी कर्मचारी न आल्याने वैतागलेल्या कर्मचार्यांनी चक्क काकडीचा फड उपटून टाकत आपला रोष व्यक्त केला.
येडूद येथील अल्पभुधारक शेतकरी विठ्ठल कदम यांनी आपल्या शेतात मार्च महिन्यात काकडीची एक एकर क्षेत्रावर लागवड केली होती. उन्हाळ्यात काकडीला चांगली मागणी असते. त्यामुळे दोन पैसे पदरात पडतील अशी अपेक्षा कदम यांना होती. काकडीचे पिक बहरले असताना एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाच्या तडाख्यात काकडीचे पिक उद्धवस्त झाले. त्यामुळे शेतात असलेली काकडी बाजारात विक्रीसाठी नेल्यानंतर तिला खरेदीदार भेटत नसल्याने कदम हे अडचणीत आले.
जिल्हा प्रशासनाने अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून मदत देवू अशी घोषणा केल्याने कदम यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. परंतू, पंधरा दिवस उलटले तरी पंचनाम्यासाठी महसूल विभागाचा एकही कर्मचारी शेताकडे फिरकलाच नसल्याने सोमवारी वैतागुन कदम यांनी आपल्या शेतातील काकडीची वेल उपटून टाकत प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा निषेध केला.
काकडीच्या लागवडीसाठी दहा हजार रूपये खर्च केला. काकडीचे पिक तयार झाले असतानाच अवकाळी पावसामुळे पिकाचे नुकसान झाले. शासन मदत देईल अशी आशा होती. परंतू, साधा पंचनामाही न केल्याने मी मंगळवारी माझ्या शेतातील काकडीचा फड उपटून टाकल्याचे विठ्ठल कदम यांनी सांगितले.
.हेही वाचा