अंबाजोगाई, पुढारी प्रतिनिधी : शहरातील हॉटेल व्यवसायिकाचा लग्न समारंभ (रविवार) आयोजित केला होता. लग्नाच्या आदल्या दिवशी हळदीच्या कार्यक्रमात डीजेच्या तालावर नाचत चक्क नवरदेवाने हवेत गोळीबार केला. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात नवरदेवासह इतर चौघांवर गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक गोपाळ सुर्यवंशी करत आहेत.
अंबाजोगाई शहरातील इलेक्ट्राॅनिक्सचे व्यापारी भास्कर चाटे, साकुड ह.मु.अंबाजोगाई यांचा मुलगा बालाजी भास्कर चाटे याचा विवाह केज रोडवरील एक मंगल कार्यालयात (रविवार) आयोजित केला होता. शनिवारी त्याचा हळदी समारंभ पार पडल्यानंतर रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास बालाजीने आपल्या मित्रासोबत डीजेच्या तालावर ठेका धरला. कार्यकर्त्यांसह नवरदेव नृत्यात बेभान झाल्यामुळे नवरदेवासह मित्रांनी पिस्टल काढून गाण्याच्या तालावर हवेत गोळीबार करण्यास सुरूवात केली.
या गोळीबाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शहर पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक गोविद यलमाटे यांनी घटनेची खातरजमा केली. यानंतर त्यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात नवरदेव बालाजी चाटे, शेख बाबा, (रा. क्रांतीनगर अंबाजोगाई) आणि इतर तिघांवर बेकायदेशीरपणे पिस्टल हातात घेऊन हावेत गोळीबार केला. इतरांच्या जिवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी आज (सोमवार) शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक गोपाळ सुर्यवंशी करीत असून या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. राजकीय कार्यकर्त्याच्या लग्नसमारंभात पिस्टलमधून गोळीबार केल्यामुळे शहरात कायदा व सुव्यवस्था आहे का नाही, असा प्रश्न उपस्थित निर्माण झाला आहे.