मराठवाडा

लातूर : रावणकोळा येथील दोन चुलत भावांच्या खूनप्रकरणी पाच आरोपींना अटक

backup backup

जळकोट; पुढारी वृत्तसेवा : चाकूने वार करुन रावणकोळा (ता.जळकोट ) येथील दोन चुलत भावांची शनिवारी (दि. १३) रात्री निर्घृण हत्या करण्यात आली. जखमी अवस्थेतील दोन्ही भावांना तातडीने जळकोटच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले होते. मात्र दवाखान्यात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झालेला होता. या दोन हत्यांमुळे जळकोट तालुक्यात एकच खळबळ उडाली होती. या खून प्रकरणातील विविध प्रश्न अनुत्तरित होते. त्यामुळे आरोपींना जेरबंद करण्याचे मोठे आव्हान जळकोट पोलिसांसमोर उभे होते. पोलिसांनीही कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्याचे काम चोखपणे पार पाडत तपासाची चक्रे गतिमान करीत ठिकठिकाणी पोबारा केलेल्या पाचही आरोपींना अटक करण्यात यश मिळविले आहे.

यासंबंधी पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, विकास शिवाजी सूर्यवंशी (वय 23 वर्षे) व महेश उत्तम सूर्यवंशी (वय 20 वर्षे रा. रावणकोळा) या दोन चुलत भावांची चाकूने मारुन गंभीर दुखापत करुन हत्या केली होती. याप्रकरणी वैजंतीमाला उत्तम सूर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आज (दि. १४) पाच आरोपींविरुद्ध कलम 302, 143, 147, 148, 149, 43 भादंवि प्रमाणे गुन्हा जळकोट पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

खून करुन नांदेडला पळून गेलेले व रावणकोळा येथे दबा धरुन बसलेले या प्रकरणातील आरोपी प्रकाश मुरहारी सूर्यवंशी, अमित माधव गायकवाड, सुदर्शन (टुब्या ) दयानंद सूर्यवंशी, शैलजा यादव सूर्यवंशी, सतीश सुखराज वाघमारे (रा. रावणकोळा) या पाचही आरोपींना जळकोट पोलिसांनी शिताफीने 24 तासांच्या आत अटक केली आहे. रावणकोळा येथे अमित माधव गायकवाड याच्या सोबत लावलेले आनलाईन दुकान बंद केल्याचा राग मनात धरुन या दोन हत्या करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

अंमलदार पोलीस उपनिरीक्षक ए. ए. पठाण यांनी हा गुन्हा दाखल करुन घेतला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील बिर्ला हे करीत आहेत. पोलीस निरीक्षक सुनील बिर्ला यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक ए. ए. पठाण, पोहेकॉ गुडाप्पे, पो. ह. नागरगोजे, पोहेकॉ राहुल वडारे, जीपचालक पो. ह. मोटे यांच्या पोलीस पथकाने रावणकोळा व नांदेड येथून या पाचही आरोपींना अटक केली आहे. सर्व आरोपींना अटक होत होत नाही तोपर्यंत शवविच्छेदन व अंत्यविधी होऊ देणार नाही अशी संतप्त भूमिका मयतांच्या नातेवाईकांनी घेतली होती. त्यामुळे आरोपींना अटक झाल्यानंतरच शवविच्छेदन करण्यात आले. या घटनेने तालुका हादरुन गेला आहे.
या हत्या प्रकरणातील गांभीर्य व परिस्थितीची जाणीव ठेवून तसेच मयतांच्या नातेवाईकांच्या भावना लक्षात घेऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली योग्य ती पावले टाकीत सर्वच्या सर्व पाचही आरोपींना 24 तासांच्या आत अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुनील बिर्ला यांनी दिली. यासाठी सहकारी पोलीस कर्मचा-यांनी अहोरात्र परिश्रम घेतल्याचेही त्यांनी सांगितले

SCROLL FOR NEXT