उल्हासनगर : उल्हासनगर येथील बी.जी. टिळक हायस्कूलच्या मुख्याध्यापिका मुस्कान हेमनानी यांना शिवीगाळ करून धमकी दिल्याप्रकरणी माजी नगरसेवक सतरामदास जेसवानी यांच्याविरोधात हिललाईन पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे.
शुक्रवारी सकाळी 10.30 वाजता शाळेच्या गेटसमोर घडली. शाळेला सुट्टी असल्याने व वीज नसल्याने विद्यार्थ्यांना लवकर सोडण्यात आले होते. त्यावेळी मुख्याध्यापिका गेटवर असताना जैस्वानी तेथे आले. त्यांनी पूर्वीच्या तक्रारीचा राग मनात धरून तुमको चालीहा प्रोग्रामसे तुमको परेशानी होती है ना असे म्हणत शिवीगाळ केली आणि तुझी औकात नाही शाळेत येण्याची, तुला बघून घेतो अशी धमकी दिली. या वादाचे मूळ चालिया महोत्सव दरम्यान शाळेच्या गेट जवळ लावण्यात येणार्या अनधिकृत स्टॉल्समध्ये आहे.
मुख्याध्यापिका हेमनानी यांनी या संदर्भात केलेल्या तक्रारींमध्ये म्हटले आहे की, या स्टॉल्समुळे शाळेच्या परिसरात दारू पिणारे, भिकारी आणि इतर गैरप्रवृत्तीचे लोक जमा होतात. यामुळे विद्यार्थ्यांच्या, विशेषतः मुलींच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होतो. तसेच, सायकल आणि गाडीच्या पार्ट्सच्या चोर्यांचे प्रकारही वाढले आहेत. या ठिकाणी माजी नगरसेवक जेसवानी यांचाही या एक स्टॉल असल्याने या तक्रारींचा राग त्यांच्या मनात होता.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, शिक्षकांना धमकावल्याच्या प्रकारामुळे सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. यासंदर्भात माजी नगरसेवक सतरामदास जेसवानी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.