Earthquake
मराठवाडा भुकंपाने हादरला Pudhari Photo
मराठवाडा

मराठवाड्यासह विदर्भ भूकंपाने हादरला; ४.५ रिश्टर स्केलची नोंद

सोनाली जाधव

हिंगोली पुढारी वृत्तसेवा : मराठवाडा आज (दि.१०) सकाळी भुकंपाने हादरला. मराठवाड्यात हिंगोली जिल्ह्यासह परभणी, वाशिम, नांदेडमध्ये भूकंपांचे धक्के बसले आहेत. आज सकाळी सातच्या सुमारास हा भुकंप झाला. आखाडा बाळापूर हे भूकंपांचे केंद्र असुन, ४.५ रिश्टर स्केलची नोंद झाली आहे.

हिंगोली जिल्हा हादरला

मराठवाड्यात आज (दि.१०) 3 ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. यात हिंगोली जिल्ह्यासह परभणी, वाशिम, नांदेडमध्ये भूकंपाचे धक्के बसले. आखाडा बाळापूर हे भूकंपांचे केंद्र होते. सकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान भूकंपाचे केंद्रबिंदू आखाडा बाळापूर पासून १३ किमी असल्याचे सांगितले जात आहे. वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे गाव आणि परिसरात नेहमीच जमिनीत गूढ आवाज येत असतात. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त समोर आलेले नाही. या भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

परभणीत वेगवेगळ्या ठीकाणी भुकपांचे धक्के

मराठवाड्या जिल्ह्यात विविध ठिकाणी भुकंपाचे धक्के बसले आहेत. परभणी जिल्ह्यातील पुर्णा, सेलु, गंगाखेड, पाथरी आदी भागात भुकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत. लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापुढे भुकंपाचा धक्का जाणवताच न घाबरता तात्काळ घराबाहेर पडून मोकळ्या जागेवर थांबावे, असा सल्ला प्रशासन व जाणकार मंडळीकडून दिला जात आहे.

पुर्णा तालुक्यात आदी देखील एकदा भुकंपाचा सौम्य धक्का बसला होता. असे भुकंपाचे अधूनमधून धक्के बसत असल्याने पुढे मोठा भुकंप होतो की काय अन् किल्लारीची पनर्रावृत्ती होणार का? अशी भिती नागरीकांमध्ये निर्माण झाली आहे.

वाशिम नागरीकांमध्ये भितीचे वातावरण

विदर्भातील वाशिम जिल्ह्यातही काही भागात भुकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाशिमधील जयपूर, टनका, सोंडा, सावळी कृष्णा भागात भूकंपाचे धक्के जाणवले.

जालनाही हादरला

जालना जिल्ह्यातील परतूर व घनसावंगी तालुक्यासह काही भागात सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. जिल्ह्यात जाणवलेले धक्के सौम्य स्वरूपाचे असून कुठेही नुकसान झालेले नाही. अशी प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे.

SCROLL FOR NEXT