गंगाखेड; पुढारी वृत्तसेवा : येथील बाजार समितीच्या सभापती, उपसभापती पदाच्या निवडणुकीत घडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर अगदी १५ दिवसांतच गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा पाथरीचे आमदार सुरेश वरपुडकर यांची शुक्रवारी (दि.१६) गंगाखेड येथे भेट झाली. या भेटीत दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाल्याने तालुक्यात राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
परभणी जिल्ह्यातील गंगाखेड बाजार समितीच्या सभापती, उपसभापती पदाच्या निवडीवरून राजकीय वातावरण तापले होते. गंगाखेड बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले होते. तरीही सभापती व उपसभापतीच्या निवडीत आमदार गुट्टे यांनी महाविकास आघाडीमध्ये उभी फूट पाडली. आणि महाविकास आघाडीचेच साहेबराव भोसले यांना सभापती करून स्वतःचे राजकीय वर्चस्व सिध्द केले. या घडामोडीत माजी आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर यांच्यात राजकीय आरोप- प्रत्यारोप झाले. त्यानंतर राष्ट्रवादीकडून गंगाखेडचे तालुकाध्यक्ष माधवराव भोसले यांची पक्षातून हकालपट्टीही करण्यात आली.
एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षात सभापती, उपसभापती पदावरून पडलेली फूट व निवडणुकीत बहुमत नसतानाही सभापतीपदाच्या निवडणुकीत बहुमत सिद्ध केल्यानंतर आमदार गुट्टे यांची तालुका तसेच जिल्हाभरात राजकीय सरशी ठरली होती. या पदाधिकारी निवडीस १५ दिवस होत नाहीत. तोच आज (दि.१६) आमदार सुरेश वरपुडकर यांनी गंगाखेड येथे आमदार रत्नाकर गुट्टे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या दोघांत बंद दाराआड अनेक राजकीय विषयावर चर्चा झाल्याची माहिती आहे.
या बैठकीला माजी जिल्हा परिषद सदस्य गणेशराव रोकडे उपस्थित होते. या बैठकीत गंगाखेड विधानसभा मतदारसंघासह परभणी जिल्ह्याच्या एकंदरीत राजकीय घडामोडीवर चर्चा झाल्याचे समजते. आगामी काळात या राजकीय भेटीचे काय पडसाद उमटतात, याकडे तालुक्याच्या राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे.