Yermala Yedeshwari Devi Shardiya Navratri Utsav Pudhari
धाराशिव

Yedeshwari Devi Navratri Utsav | येडेश्वरी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाची तयारी पूर्ण; रविवारपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन

नवरात्र काळात दररोज देवीची विविध रूपांतील पूजा, आरती आणि भजनी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले

पुढारी वृत्तसेवा

Yermala Yedeshwari Devi Shardiya Navratri Utsav

येरमाळा : तुळजाभवानी देवीची धाकटी बहीण म्हणून परिचित असलेल्या श्री येडेश्वरी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. रविवार (दि. ११) अश्विन शुद्ध प्रतिपदेला रात्री आठ वाजता पंचोपचार महापूजा, महाआरती आणि घटस्थापनेने महोत्सवाला प्रारंभ होणार आहे. नवरात्र काळात दररोज देवीची विविध रूपांतील पूजा, आरती आणि भजनी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

नवसाला पावणारे जागृत देवस्थान म्हणून येडेश्वरी देवीची महाराष्ट्रासह परराज्यांत ख्याती आहे. तुळजाभवानी देवीच्या दर्शनानंतर अनेक भाविक येडेश्वरी देवीच्या दर्शनासाठी (ता. कळंब, जि. धाराशिव) येतात. नवरात्रोत्सवात देवीच्या तांदळ्यावर बखाड्या लिंबाच्या पत्री-पानांनी विविध पूजाविधी केले जातात. घटस्थापनेच्या दिवशी पारंपरिक नागवेलीच्या पानांनी महापूजा होणार असून, येरमाळा आणि बाभळगाव येथील भजनी मंडळांचे रात्रजागराचे कार्यक्रम होणार आहेत.

सोमवारी (दि. १२) एक वेढ्याची पूजा होणार असून, पानगाव, परतापूर आणि सटवाईवाडी येथील भजनी मंडळांचे कार्यक्रम होतील. मंगळवारी (दि. १३) दोन वेढ्यांची पूजा आणि उमरा व मलकापूर येथील भजनी मंडळांचा रात्रजागर होईल. बुधवारी (दि. १४) चंद्राची पूजा आणि नागझरवाडी येथील भजनी मंडळाचा कार्यक्रम होणार आहे. गुरुवारी (दि. १५) मोराची पूजा होणार असून, ललित पंचमीनिमित्त रात्री नऊ वाजता देवीच्या पालखीचा छबिना निघेल. या दिवशी व्रत करणाऱ्या महिला भाविकांची दर्शनासाठी गर्दी होते.

शुक्रवारी (दि. १६) आकड्याची पूजा आणि कसबे तडवळे येथील भजनी मंडळाचा रात्रजागर, शनिवारी (दि. १७) नारळाची पूजा आणि कन्हेरवाडी व बांगरवाडी येथील भजनी मंडळांचे कार्यक्रम होतील. रविवारी (दि. १८) साखळीची पूजा आणि उक्कडगाव व उपळाई येथील भजनी मंडळांचा रात्रजागर होईल. सोमवारी (दि. १९) वाघाची पूजा आणि घारी व खांडवी येथील भजनी मंडळांचे कार्यक्रम होणार आहेत.

मंगळवारी (दि. २०) नवमीनिमित्त उत्तररात्री होमहवन सुरू होईल. पहाटे सूर्योदयापूर्वी पूर्णाहुती व बलिदानानंतर देवीची महापूजा, आरती आणि पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्यात येईल. विजयादशमीला सायंकाळी पाच वाजता देवीच्या पालखीसह सीमोल्लंघन होणार आहे.

सोमवारी (दि. २६) कोजागरी पौर्णिमेनिमित्त बारवाची पूजा आणि रात्री नऊ वाजता पालखीसह छबिना होईल. महोत्सव काळात दररोज पहाटे आणि रात्री साडेआठ वाजता देवीची पंचोपचार पूजा व आरती होणार असल्याची माहिती देवस्थान ट्रस्टच्या वतीने देण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT