सुखदेव गायके
येरमाळा : श्री येडेश्वरी देवीच्या चैत्र पोर्णिमा यात्रा महोत्सवात यात्रेतील मुख्य सोहळा चुनखडी वेचण्यासाठी लाखो भाविक येरमाळा नगरीत दाखल झाले होते. यात्रेचा मुख्य दिवस लाखो भाविकांच्या गर्दीमुळे गजबजून गेला. या वर्षी श्री येडेश्वरी देवीची यात्रा मोठ्या प्रमाणात भरली असून चुना वेचण्याचा मुख्य कार्यक्रम शुक्रवारी (दि .3) मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमासाठी राज्यासह बाहेर राज्यातील चौदा ते पंधरा लाख भाविक येरमाळा नगरीत दाखल झाले होते. येडेश्वरी देवीची पालखी मुख्य मंदिरावरून सकाळी आठ वाजता निघाली बाजार चौकात सकाळी 10 वाजता पालखीचे आगमन झाल्यानंतर पुष्पहारांनी पालखीचे स्वागत करण्यात आले .
चुन्याच्या रानात सकाळी 11 वा पालखीचे आगमन होताच लाखों भाविकांनी चुनखडीचे खडे वेचून पालखीवर टाकत आई राजा उदे उदेचा एकच जय घोष केला भाविकांच्या या गजराने चुन्याच्या रानाचा परिसर दुमदुमून गेला होता.
आज सकाळी येडेश्वरी देवीची पालखी डोंगरावरील मंदिरातून आमराई मंदिराकडे हालगी, जहांज, संबळाच्या गजरात वाजत गाजत निघाली. पुढील पाच दिवस पालखी अमराई मंदिरामध्ये मुक्कामी असते. मुख्य चुन्याच्या रानात पालखी येताच भाविकांनी आई राजा उदे उदे, येडुसरीचा उदे उदेच्या जयघोष करताच चुन्याच्या रानाचा परिसर भाविकांच्या गजराने दणाणून निघाला.
श्री येडेश्वरी देवीच्या मंदिराला यात्रेनंतर पालखी डोंगरावरील मुख्य मंदिरात परत गेल्यानंतर चुन्याने रंगावण्याची पूर्वापार परंपरा चालत आली आहे. त्यामुळे चुना वेचण्याचा कार्यक्रम यात्रेचा मुख्य कार्यक्रम मानला जातो. चुना वेचण्यासाठी यात्रेला येण्याची परंपरा भाविकांच्या पिढ्यान्पिढ्या चालत आलेली प्रथा असल्याने मजूर, शेतमजूर, बिगारी, चाकरमानी कर्मचारी, लहान मोठे व्यावसायिक, व्यापारी,भाविक राज्यभरातून न चुकता दरवर्षी चुना वेचण्यासाठी दाखल होतात. काळानुरूप या यात्रेला येणाऱ्या भाविकांची संख्या प्रतिवर्षी वाढतच गेल्याने आता ती लाखोंच्या संख्येवर पोहचली.
श्री येडेश्वरी देवीच्या चुना वेचण्याच्या कार्यक्रमाला वेगळे महत्त्व असून यात्रेत या दिवशी येणाऱ्या पालखीवर चुन्याच्या रानात पालखी येताच चुन्याचे पाच खडे वेचून पालखीवर टाकण्यासाठी लाखों भाविकांची झुंबड उडते. त्यामुळे भाविकांची आपले चुन्याचे खडे पालखीवर पडावे यासाठी स्पर्धाच लागली आहे की काय असे चित्र दिसत होते.
यात्रेत भाविकांनी वेचलेला चुना गोवऱ्याची भट्टी लावून भाजला जातो यात्रेनंतर पालखी मुख्य मंदिरात पोहचल्याच्या दुसऱ्या दिवशी देवीचे मंदिर चुन्याने रंगवले जाते. त्यामुळे यात्रेत चुना वेचण्याचा प्रथा रुढ झाल्याचे जाणकारांचे मत आहे. ही परंपरा पिढ्यान्पिढ्या चालत आली असून चुन्याच्या रानात पालखी येताच चुनखडीचे खडे आपोआप रानात येतात असे लोक सांगतात. चुन्याच्या रानातून देवीची पालखी 12.30 वाजता आमराई मंदिरातील पालखी मंदिरात पोचली येथेही पालखी दर्शनासाठी भाविकांनी दिवसभर गर्दी केली होती.
श्री येडेश्वरी देवीच्या यात्रेसाठी पोलिस प्रशासनाने विविध उपाय योजना आखून तगडा बंदोबस्त केला होता.आज पालखी मुख्यमंदिरातून पोलिस प्रशासन, देवस्थान सयंसेवक ,स्थानिक ग्रामसुरक्षा दलाच्या संरक्षण कड्यात निघाल्याने सुरक्षितपणे पालखी मिरवत आली. यावेळी ग्रामपंचायतचे पदाधिकारी, देवस्थानचे पुजारी, मानकरी, खांदेकरी पालखी सोबत होते. पालखीच्या दर्शनासाठी लोकप्रतिनिधी आ. राणाजगजीतसिंह पाटील, आ. कैलास पाटील उपस्थित होते.
भाविकांना पिण्याच्या पाण्यासाठी ठिकठिकाणी पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात आली होती.भारतीय स्टेट बँकेच्या वतीने थंड आरओ पाण्याच्या पाणपोईची व्यवस्था करण्यात आली होती.पालखी चुन्याच्या राणात येताच आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या सहकार्यांतून हेलिकॉप्टरमधून पालखीवर फुलांचा वर्षाव करण्यात आला.
यावेळी आलेल्या लाखो भाविकांनी हा सोहळा आपल्या डोळ्यात साठवला. ठिकठिकाणी अनेक गावकरी व लोकप्रतिनिधी यांच्या वतीने भाविकांना पाणी, जेवण, नाष्ट्याची सोय करण्यात आली होती. देवीच्या पालखीचे आज चैत्र पौर्णिमा यात्रेनिमित्त आमराई मंदिराकडे आगमन होणार असल्याने स्थानिक भविकांत मोठा उत्साह होता. पालखीच्या स्वागतासाठी गावातील महिला भाविकांनी बाजारचौक, वाणीगल्ली, रोकडेश्वर मारुती मंदिर चौक, छत्रपती मार्केट, संभाजीनगर रस्त्यावर मोठमोठ्या रांगोळी,फुलांच्या रांगोळीची सजावट केली होती.
मोबाईल बनले शोभेची वस्तू
बुधवारपासूनच भाविक लाखोंच्या संख्येने येरमाळ्यात दाखल होत होते.भाविकांची विक्रमी संख्या दाखल झाल्याने प्रत्येकाच्या हाती असलेले प्रत्येक कंपनीचे स्मार्ट फोन कव्हरेज मिळतं नसल्याने शोभेची वस्तू ठरले.यामुळे 2 तारखेच्या दुपार पासून 3 तारखेच्या 5 वाजेपर्यंत ऑनलाईन खरेदी, विक्री व्यवहार सर्व्हर डाऊन असल्याने बंद राहिले.प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींचीही वृत्तसंकलन करताना मोठी अडचणी येत होत्या.
वाहतूक ठप्प
यंदाची यात्रा म्हणजे भाविकांच्या जमलेल्या अलोट गर्दीने आज पर्यंतचे विक्रम मोडीत काढणारी यात्रा ठरली चुना वेचाण्याच्या कार्यक्रमानंतर परत फिरलेल्या भाविकांच्या वाहनांमुळे राष्ट्रीय महामार्ग सोलापूर ते बीडपर्यंत वाहतूक कोंडी झाल्याने विस्कळीत सेवा झाली होती .