धाराशिव

Dharashiv Crime : यूपी पोलिसांची उमरग्यात मोठी कारवाई; गँगस्टरची २५ कोटींची मालमत्ता सील

पुढारी वृत्तसेवा

उमरगा (जि. धाराशिव) : उत्तर प्रदेशातील कुप्रसिद्ध गँगस्टर विजय मिश्रा याच्या कथित गुन्हेगारी साम्राज्यावर युपी प्रशासनाने मोठा घाव घातला आहे. महाराष्ट्रातील उमरगा तालुक्यातील जकेकुर येथील तब्बल २० ते २५ कोटी रुपयांच्या दाल मिलवर जप्तीची (कुर्क) धडक कारवाई करण्यात आली. गुन्हेगारीच्या पैशातून उभारण्यात आलेल्या एकूण १०० कोटी २५ लाख रुपयांच्या मालमत्तेवर ही कारवाई सुरू होताच उमरगा औद्योगिक वसाहतीत एकच खळबळ उडाली असून, अवैध मार्गाने संपत्ती उभी करणाऱ्यांचे धाबे दणाणल्याची चर्चा रंगली आहे.

उत्तर प्रदेशातील भदोही जिल्ह्याच्या जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांनी २ जुलै २०२६ रोजी दिलेल्या आदेशानुसार, 'यूपी गँगस्टर ॲक्ट'च्या कलम १४(१) अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. त्यानुसार मंगळवारी (दि. ७) उमरगा-लातूर रोडवरील जकेकुर औद्योगिक वसाहतीतील प्लॉट क्रमांक बी-१०२ वरील 'लल्ली ॲग्रो इंडस्ट्रीज एलएलपी' या पल्स (दाल) मिलच्या मुख्य प्रवेशद्वारावर प्रशासनाने अधिकृत जप्तीचा फलक लावला.

चौकशीत विजय मिश्रा याने कथित गुन्हेगारी उत्पन्नातून ही मालमत्ता आपला जावई मुकेश तिवारी व मुलगी गरीमा तिवारी (रा. विलेपार्ले, मुंबई) यांच्या नावावर खरेदी केल्याचे नमूद करण्यात आले आहे. सुमारे ५ हजार ५० चौरस मीटर क्षेत्रावरील या प्रकल्पाची किंमत २० ते २५ कोटी रुपयांच्या घरात असल्याचा अंदाज आहे.

यूपी गँगस्टर विजय मिश्रा कोण?

उत्तर प्रदेशातील गोपीगंज पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १०९/२०२२ अंतर्गत हे प्रकरण नोंद आहे. या गुन्ह्यात गँगलीडर विजय रामदेव मिश्रा (रा. खपटिहा, जि. प्रयागराज) याच्याविरुद्ध 'उत्तर प्रदेश गँगस्टर आणि समाजविघातक कृत्ये (प्रतिबंध) अधिनियम' (यूपी गँगस्टर ॲक्ट) च्या कलम ३(१) अन्वये कारवाई सुरू आहे. तपासादरम्यान विजय मिश्रा याने कथित गुन्हेगारी कारवाया आणि बेकायदेशीर आर्थिक व्यवहारांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर संपत्ती उभारल्याचा आरोप आहे.

त्यानंतर संबंधित मालमत्तेचा शोध घेऊन ती नातेवाईकांच्या नावावर असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. भदोही जिल्ह्याच्या जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांनी २ जुलै २०२६ रोजी दिलेल्या आदेशानुसार, उमरगा तालुक्यातील जकेकुर चौरस्ता येथील दाल मिलचा समावेश करून ही जप्तीची प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

'कुर्क' म्हणजे काय?

'कुर्क' म्हणजे न्यायालय किंवा सक्षम प्राधिकाऱ्याच्या आदेशानुसार संबंधित मालमत्तेवर शासनाचा अधिकृत ताबा प्रस्थापित करणे. अशी मालमत्ता जप्त झाल्यानंतर तिची विक्री, हस्तांतरण किंवा कोणताही आर्थिक व्यवहार करता येत नाही. संबंधित व्यक्तीचा त्या मालमत्तेवरील ताबा आणि व्यवहाराचे अधिकार कायदेशीररीत्या पूर्णपणे मर्यादित केले जातात.

‘उत्तर प्रदेशातील भदोही जिल्हा मॅजिस्ट्रेट यांनी संबंधित आरोपीविरुद्ध 'गुंडा ॲक्ट' अंतर्गत दिलेल्या आदेशानुसार लातूर रोडवरील जकेकुर चौरस्ता एमआयडीसी परिसरातील मालमत्ता सील करण्याची कारवाई करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश पोलीस, स्थानिक महसूल प्रशासन आणि उमरगा पोलीस पथकाने संयुक्तपणे कायदेशीर प्रक्रियेसह शांततेत आणि नियमानुसार ही कारवाई पार पाडली. कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही आणि आदेशांची प्रभावी अंमलबजावणी करणे हीच आमची प्राथमिक जबाबदारी आहे.’
प्रल्हाद सूर्यवंशी (पोलीस निरीक्षक, उमरगा)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT