लोहारा, पुढारी वृत्तसेवा : लोहारा तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपले आहे. त्यामुळे शेतातील पिके, फळबागा, वीट उद्योग यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. दरम्यान माळेगाव शिवारात लोहारा- आष्टा मोड रस्त्यावर विद्युत खांब पडल्याने वाहतूक कोलमडली होती. तर वादळी वाऱ्याने घरावरचे पत्रे उडाले. यात डोक्यावर पत्र्यावरील दगड पडून एक महिला गंभीर जखमी झाली आहे. ही घटना गुरूवारी रात्री ८ ते ९ या दरम्यान घडली आहे.
लोहारा तालुक्यात (जि. धाराशिव) सुर्य आग ओकत असल्याने गरमीने नागरिक उकडून निघत आहेत. त्यातच गुरूवारी (दि.२०) रात्री अचानक पूर्व दिशेला विजांचा कडकडाट सुरू झाला. आभाळ भरून आले. त्यातच जोरदार वादळ सुटले. तालुक्यातील माकणी, सास्तुर, तावशीगड, धानुरी, तोरंबा, हराळी, करजगाव, चिंचोली काटे, चिंचोली रेबे, माळेगाव, पांढरी, हिप्परगा सय्यद या गावांना अक्षरशः झोडपून काढले. सध्या सुगीचे दिवस असल्याने अनेकांनी गहु, हरभरा, ज्वारी काढून रानावर ठेवली आहे. तर काही शेतकऱ्यांची पिके रानावर उभे आहेत. या वादळामुळे काढून रानावर टाकलेली पिके जागीच भिजून गेली. तर उभे पिके जमीनदोस्त होऊन प्रचंड नुकसान झाले. आंबा, द्राक्षांच्या बागांचेही नुकसान झाले. तालुक्यातील वीट भट्टी व्यावसायिकांचे मोठे अर्थिक नुकसान झाले आहे.
माळेगाव येथील अनेकांच्या घरावरचे पत्रे उडाले. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. पत्र्यावरचा दगड डोक्यात पडून मंदाकिनी सत्यवान गुंड (रा. माळेगाव, ता. लोहारा) या गंभीर जखमी झाल्या आहेत. माळेगाव शिवारात लोहारा-आष्टामोड रस्त्यावर विद्युत खांब पडल्याने वाहतुक कोलमडली. सरपंच वैभव पवार, पोलीस पाटील बालाजी कदम यांनी घटनास्थळी धाव घेतली. व विद्युत पुरवठा खंडित करण्यास सांगितले. सय्यद हिप्परगा येथील आंब्याच्या भागांसह झाडे जमीनदोस्त झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिसकावून घेतला आहे.