Pudhari
धाराशिव

Umarga ZP Election | उमरगा तालुक्यात ZP, पंचायत समितीसाठी १०० पेक्षा अधिक उमेदवारी अर्ज दाखल

Dharashiv Local Elections | जिल्हा परिषद ९ गट आणि पंचायत समितीच्या १८ गणांसाठी राजकीय पक्षांसह अपक्षांची मोठ्या संख्येने नामनिर्देशन पत्रे दाखल

पुढारी वृत्तसेवा

ZP Nomination Filing Dharashiv

उमरगा: तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारी (दि. २१) तहसील कार्यालय परिसरात गर्दी उसळली. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी सायंकाळपर्यंत १०० पेक्षा अधिक उमेदवारी अर्ज दाखल झाले असून रात्री उशिरापर्यंत ही प्रक्रिया सुरू होती. इच्छुक उमेदवार, त्यांचे समर्थक, विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मोठी गर्दी झाल्याने परिसरात चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता.

उमरगा तालुक्यातील जिल्हा परिषद ०९ गट आणि पंचायत समितीच्या १८ गणांसाठी प्रमुख राजकीय पक्षांसह अपक्षांनीही मोठ्या संख्येने नामनिर्देशन पत्रे दाखल केली. कुन्हाळी जिल्हा परिषद गटातून भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य यांच्या पत्नी रोहिणी चालुक्य यांनी सुचकामार्फत अर्ज दाखल केला, तर गुंजोटी गटातून भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष शहाजी पाटील यांनी उमेदवारी अर्ज सादर केला.

काँग्रेसकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करत कुन्हाळी गटातून लता मोरे, तर कवठा गटातून काँग्रेसचे महेश देशमुख यांनी एकत्रितपणे अर्ज दाखल केला. कदेर जिल्हा परिषद गटातून शिवसेनेचे माजी खासदार प्रा. रविंद्र गायकवाड यांच्या पत्नी उषा गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तसेच माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची कन्या आकांक्षा चौगुले यांनी केसरजवळगा पंचायत समिती गणातून आपली उमेदवारी निश्चित केली.

निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार गोविंद येरमे यांनी उमेदवारांचे अर्ज स्वीकारले. दरम्यान अर्ज दाखल करण्यासाठी सकाळपासून मोठ्या रांगा लागल्या होत्या. संभाव्य गर्दी लक्षात घेऊन निवडणूक विभागाने अधिक काटेकोर नियोजन करण्याची गरज होती; मात्र प्रशासनाचे नियोजन सकाळच्या पहिल्याच तासांत कोलमडल्याचे चित्र दिसून आले. गर्दी आवरताना मोठी कसरत करावी लागली. अखेर सर्व उमेदवारांचे अर्ज एकत्रितपणे स्वीकारून नंतर अनुक्रमांकानुसार अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्यात आली. त्यामुळे दिवसभरात नेमके चित्र स्पष्ट होऊ शकले नाही.

प्रस्थापिताच्या घरातील तसेच नवे चेहरे मैदानात!

जिल्हा परिषद व पंचायत समित्या या ग्रामीण विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या संस्था असल्याने या निवडणुकांकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे. शेतकरी, महिला, युवक, कामगार तसेच विविध सामाजिक घटकांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी अनेक नव्या चेहऱ्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने यंदाची निवडणूक अधिकच रंगतदार ठरण्याची चिन्हे आहेत. परिणामी प्रस्थापित नेत्यांच्या घरातील उमेदवारांसमोर नव्या उमेदवारांचे कडवे आव्हान उभे राहणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT