उमरगा - एडीआयपी योजनेंतर्गत मोफत तपासणी व कृत्रिम अवयव साहित्य वाटप शिबिरात अनेक दिव्यांगांना जमिनीवर उन्हात बसावे लागले. pudhari photo
धाराशिव

Umarga ADIP camp : ‘ज्यांच्यासाठी शिबीर, त्यांचीच उपेक्षा!’

उमरगा : भर उन्हात बसण्याची आली वेळ, पाण्याविना दिव्यांगांची ससेहोलपट

पुढारी वृत्तसेवा

उमरगा : दिव्यांग व्यक्तींना सहाय्यभूत ठरणाऱ्या एडीआयपी योजनेंतर्गत मोफत तपासणी व कृत्रिम अवयव, सहाय्यभूत साहित्य वाटपासाठी शनिवारी (दि. २९) उपजिल्हा रुग्णालयात आयोजित शिबिरात दिव्यांगांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाल्याचे समोर आले. पुरेशी मंडप व बैठक व्यवस्था नसल्याने अनेकांना चक्क जमिनीवर बसावे लागले. भर उन्हात पाणी व नाश्त्याअभावी दिव्यांगांची अक्षरशः ससेहोलपट झाली.

पंचायत समितीच्या वतीने आयोजित या शिबिरात शासनाच्या योजनेचा लाभ मिळणार असल्याने विविध गावांतून दिव्यांग आवश्यक कागदपत्रांसह मोठ्या संख्येने दाखल झाले होते. एकूण ३०१ जणांची नोंदणी झाली, त्यापैकी १९९ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. पात्र लाभार्थ्यांना लवकरच विविध सहाय्यभूत साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे.

मात्र, शिबिराच्या ठिकाणी पुरेशी बैठक व्यवस्था नसल्याने अनेक दिव्यांगांना जमिनीवर बसून प्रक्रिया पूर्ण करावी लागली. कडक उन्हात तासन्तास रांगेत उभे राहावे लागल्याने त्यांच्या अडचणीत आणखी भर पडली. पिण्याच्या पाण्याचीही पुरेशी व्यवस्था नसल्याने लाभार्थ्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागली. त्यामुळे ‘ज्यांच्यासाठी शिबिर, त्यांचीच उपेक्षा’ असा संतप्त सवाल उपस्थित केला.

नियोजनाचा बोजवारा!

सकाळपासून पाणी व भोजनाविना भर उन्हात बसलेल्या दिव्यांगांचा संताप अनावर झाला. आ.प्रवीण स्वामी व शरण पाटील यांनी शिबिराला भेट दिल्यानंतर प्रशासनाने नाश्त्याची व्यवस्था केली; मात्र दिव्यांगांनी तो नाकारला. दरम्यान, जिल्हा परिषद सदस्य महेश देशमुख यांना माहिती मिळताच त्यांनी पुढाकार घेत स्वामी विवेकानंद फाउंडेशनच्या माध्यमातून बाटलीबंद पाणी व भोजन उपलब्ध करून दिले. त्यामुळे प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

प्रशासनाचे म्हणणे

‘एडीआयपी’अंतर्गत पात्र लाभार्थ्यांची तपासणी व निवड करण्यासाठी हे शिबीर होते. आवश्यक निकष पूर्ण करणाऱ्या दिव्यांगांची निवड करण्यात आली आहे. काहींनी अपात्र लाभार्थ्यांना पात्र ठरवून तत्काळ साहित्य वाटप करण्याची मागणी केली. शिबिराच्या ठिकाणी मंडप, बैठक व्यवस्था, चहा, पाणी व नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती. नियमांनुसार निवड प्रक्रिया राबविण्यात आली असून लवकरच स्वतंत्र साहित्य वाटप शिबीर आयोजित केले जाईल असे प्रभारी गटविकास अधिकारी विनोद जाधव यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT