तुळजापूर : श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवातील सातव्या माळेला रविवारी मातेची भवानी तलवार अलंकार महापूजा बांधण्यात आली. रविवारी सकाळी पंचामृत अभिषेक पार पडल्यानंतर मातेची शोड्षोपचार पूजा, नैवेद्य, धुपारती अंगारा पार पडल्यानंतर विशेष अवतार पूजा बांधण्यात आली. मातेच्या या विशेष अवतार पूजेतून छत्रपती शिवाजी महाराज आणि मातेच्या भेटीतून महाराजांना तलवाररूपी आशीर्वाद आणि नवचैतन्य, शक्ती प्रदान करण्याचा क्षण दिसून येतो.
श्री तुळजा भवानी मातेने छत्रपती शिवरायांना दिलेल्या आशीर्वाद रुपी तलवारीचा प्रसंग ‘भवानी तलवार’ या विशेष अवतार पुजेतून साकार केला जातो. या विशेष अवतार पूजेच्यावेळी छत्रपतींनी त्याकाळात मातेला अर्पण केलेली १०८ पुतळ्याची माळ मातेच्या अंगावर आवर्जून घालण्यात येते.सोमवारी दुर्गाष्टमी निमित्त सकाळी ६ वाजता वैदिक होम हवनास प्रारंभ होणार आहे. या होमास सकाळी ११ वाजता पूर्णाहुती दिली जाणार असून आठ दिवसापासून येथे सुरू असलेल्या शारदीय नवरात्र महोत्सवाची घटोत्थापनाने सांगता मंगळवारी दुपारी १२ वाजता अजाबलीच्या धार्मिक विधीनंतर होणार आहे.
गेल्या आठवडाभरात देवीच्या पाच विशेष अवतार पूजांसह मातेची दररोज सायंकाळी छबिना मिरवणूक काढण्यातआली.मंगळवारी सार्वत्रिक सीमोल्लंघन,शमी-शस्त्रपूजन पार पडणार असून बुधवारी पहाटे देवीचे सीमोल्लंघन व शिबीकारोहण सोहळा पार पडणार आहे.