संजय कुलकर्णी
तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी राज्यासह परराज्यातून सोमवारी (२६ ऑक्टोबर) तुळजापुरात आलेल्या किमान पाच लाखांहून अधिक भाविकांनी आश्विन पौर्णिमेचा सोहळा ‘याचि देही, याची डोळा’ साजरा केला. यावेळी सोलापूरच्या काठ्यांसह निघालेल्या छबिना मिरवणुकीने यात्रेची सांगता झाली.
मंदिराचा संपूर्ण परिसर रंगीबेरंगी फुलांनी सजविण्यात आला होता. महाद्वारासमोरील २०० मीटरचा प्रांगण बॅरिकेडिंग करून मोकळा ठेवण्यात आला होता. परिणामी भाविकांना दूरवरून महाद्वार दर्शन घ्यावे लागले. सोमवारी दर्शनासाठी झालेल्या प्रचंड गर्दीमुळे शहरातील लॉज, धर्मशाळा, भक्तनिवास हाऊसफुल्ल झाल्याने अनेकजण पुजाऱ्यांच्या घरी किंवा स्थानकावर थांबणे पसंत करीत होते.
सोमवारी दुपारी १२ वाजेदरम्यान सोलापूर येथील शिवलाड तेली समाजाच्या दोन मानाच्या काठ्या व पालखीचे तुळजापूर नगरीत आगमन झाले. या काठ्या बारालिंगाचे दर्शन घेऊन घाटशीळमार्गे तुळजापूर शहरात दाखल झाल्या. या काठ्यांसोबत शेकडो मानकरीही दाखल झाले. या काठ्या देवीचे भोपे पुजारी सचिन पाटील, संभाजी पाटील यांच्या घरी दोन दिवस मुक्कामासाठी रवाना झाल्या. त्यानंतर या काठ्यांनी रात्री ९ वाजता तुळजा भवानी मंदिराकडे मातेच्या छबिना मिरवणुकीसाठी प्रस्थान ठेवले.
काठ्यांच्या मानकऱ्यांकडून मातेची महापूजा करण्यात आली. रात्री या काठ्यांसह निघालेल्या छबिना मिरवणुकीनंतर आश्विन यात्रेची सांगता झाली. छबिना मिरवणुकीनंतर महंत तुकोजी बुवा यांनी मंदिर परिसरात मातेचा जोगवा मागितला. दरम्यान, मंगळवारी सायंकाळीही काठ्यांसह मातेचा छबिना निघणार आहे.
देवीची श्रमनिद्रा पूर्ण झाल्यावर पंचामृत अभिषेक
मंगळवारी सीमोल्लंघन सोहळ्यानंतर सुरू झालेली श्री तुळजाभवानी मातेची श्रमनिद्रा रविवारच्या उत्तररात्री पूर्ण होऊन मुख्य मूर्ती सिंहासनाधिष्ठीत करण्यात आली. पाच दिवसांनंतर मूर्तीला पंचामृत अभिषेक सुरू झाले. यावेळी भाविकांना थेट गाभाऱ्यातून अभिषेक दर्शन घेण्याचे भाग्य लाभले.