Tuljabhavani Temple 
धाराशिव

Tuljabhavani Temple : तुळजापुरात भाविकांची सुरक्षा वाऱ्यावर

सीसीटीव्ही ‘शो’साठी आहेत का? भाविकांचा सवाल

पुढारी वृत्तसेवा

संजय कुलकर्णी

तुळजापूर : तुळजाभवानी मातेच्या यात्रेदरम्यान देवी दर्शनाला येणाऱ्या लाखों भाविकांच्या आरोग्यासह सुरक्षेची काळजी घेण्याच्या दृष्टीने हजारोंचा ताफा दिमतीला असतानाही भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. मंदिरात पितळी दरवाजासमोर पोलिस कर्मचारी आणि मंदिराचे सुरक्षा रक्षकांमध्ये सिनेस्टाईल हाणामारी झाली यामागचे कारण अस्पष्ट असले तरी मंदिर संस्थानने या घटनेकडे फारसे गांभीर्याने पाहिलेले दिसत नाही.

यावर मंदिर प्रशासनाने कुणावर काय कारवाई केली हेही स्पष्ट केलेले नाही. दरम्यान मंदिरात बंदोबस्तावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये हाणामाऱ्या होत असतील तर भाविकांच्या सुरक्षेचे काय? असा सवाल उपस्थित होत आहे. शहरातील आर्य चौकात एका इसमाचा आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना घडली. सदर व्यक्ती कुठून आला होता. तो कशामुळे आणि केंव्हा मृत्यू पावला याची कुणीही माहिती देण्यास पुढे येईना. याशिवाय शनिवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास शहरातील सारा गौरव हाऊसिंग सोसायटी समोर सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर भवानी ज्योत घेऊन जाणाऱ्या युवकाला भरधाव वाहनाने चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. यावर्षी दुष्काळी परिस्थितीला तोंड देत लाखों भाविक तुळजापूर वारी पूर्ण करीत आहेत. तुळजापूर शहरावर २३३ सीसीटिव्ही कॅमेऱ्यांची नजर असताना आणि हजारों पोलिस कर्मचारी सुरक्षेवर तैनात असूनही यात्रा काळात घडणाऱ्या अप्रिय घटना पोलिस यंत्रणेची लक्तरे वेशीवर टांगत आहेत.

शहरात सध्या खासगी वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. चारही दिशेला चेक पोस्ट केलेले असताना असंख्य वाहने भाविकांच्या गर्दीत रस्त्यावर उभी असल्याचे दिसत आहे. ही वाहने काढून रस्ता मोकळा करणे अपेक्षित असताना कुठलाही सुरक्षा कर्मचारी रस्त्यावरील दुचाकी,चारचाकी वाहने काढीत नसल्याने मोठी गैरसोय होताना दिसत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT