तुळजापूर, पुढारी वृत्तसेवा: शारदीय नवरात्र महोत्सवाच्या चौथ्या दिवशी तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरामध्ये देवीला रथ अलंकार महापूजा बांधण्यात आली होती. शेकडो भाविक भक्तांनी या निमित्ताने तुळजाभवानी देवीचे धर्मदर्शन आणि मुखदर्शन घेतले. आई राजा उदो उदोच्या जयघोषामध्ये भाविकांनी मनोभावे देवीचे गुणगान केले आणि देवीचे आशीर्वाद घेतले. (Sri Tuljabhawanidevi)
तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने वेगवेगळ्या पूजा केल्या जातात. चतुर्थीच्या निमित्ताने बुधवारी रथालंकार महापूजा करण्यात आली होती. तुळजाभवानी देवी रथामध्ये बसून सार्थक करीत आहे, देवीच्या रथाला सात घोडे बांधलेले असून देवीच्या हातामध्ये सार्थक करणारी दोरी आहे. दुसऱ्या हातामध्ये चाबूक असून देवी रथ चालवीत असल्याचे दिसून येत आहे. चतुर्थीच्या निमित्ताने सकाळपासून धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल मंदिरामध्ये दिसून आली. मध्यरात्री १ वाजता तुळजाभवानी देवीची चरण तीर्थ पूजा संपन्न झाली. त्यानंतर देवीचे धर्मदर्शन सुरू झाले, ही पूजा आरती पूर्ण झाल्यानंतर सकाळी ७ वाजेपर्यंत सुरु होते. (Sri Tuljabhawanidevi)
सकाळी ७ वाजता नवरात्र काळात अभिषेक पूजा करण्यासाठी आलेल्या भाविकांचे अभिषेक देवीला करण्यात आले. मंगळवारी रात्री दहा वाजता तुळजाभवानी देवीचा छबिना निघाला आणि छबिनामध्ये मोठ्या संख्येने भाविकांनी सहभाग नोंदवला.
देवीचे पूजारी सचिन परमेश्वर, बाजार समितीचे सभापती सचिन पाटील, काँग्रेस जिल्हा अध्यक्ष धीरज पाटील, अतुल मलबा, गब्बर सोंजी, प्रशांत साँजी, समाधान परमेश्वर, धीरज भय्ये, यांनी सुमारे दीड तास पूजा बांधण्याचे काम केले. परंपरागत पद्धतीने नवरात्र काळात ही पूजा मांडण्याची ही परंपरा आहे. याप्रसंगी तहसीलदार सोमनाथ माळी, प्रशासनातील अधिकारी सिद्धेश्वर इंतुळे आदी उपस्थित होते.
हेही वाचा