तुळजापूर तीर्थक्षेत्राचा कायापालट दृष्टीपथात pudhari photo
धाराशिव

Tuljapur Redevelopment : तुळजापूर तीर्थक्षेत्राचा कायापालट दृष्टीपथात

438 कोटींची निविदा प्रसिध्द

पुढारी वृत्तसेवा

धाराशिव : कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचे दर्शन घेण्यासाठी जगभरातून येणाऱ्या लाखो भाविकांना आता जागतिक दर्जाच्या सुविधा मिळणार आहेत. तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत 438 कोटी 69 लाख रुपयांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. हा प्रकल्प म्हणजे तुळजापूरला जागतिक दर्जाचे धार्मिक पर्यटन केंद्र बनवण्याच्या दिशेने पडलेले एक भक्कम पाऊल आहे. हा निर्णय म्हणजे स्वप्नपूर्तीच्या दिशेने पडलेले आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याची माहिती आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.

राज्य सरकारने तुळजापूरच्या विकासासाठी एकूण 1865 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यानुसार या निविदेतील कामात प्रामुख्याने भाविकांच्या मूलभूत गरजा आणि आधुनिक सोयीसुविधांवर भर देण्यात आला आहे. हुडको एसटी स्टँड, आराधवाडी आणि घाटशीळ परिसरात मोठ्या प्रमाणावर कामे हाती घेण्यात येणार आहेत.

यामध्ये अत्याधुनिक भाविक सुविधा केंद्र, भव्य भक्त निवास, व्यावसायिक संकुल, मल्टीपर्पज हॉल आणि सुसज्ज पार्किंग व्यवस्थेचा समावेश असणार आहे. ही सर्व कामे पुढील दोन वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून, इच्छुक कंत्राटदारांना 2 मार्च 2026 पर्यंत निविदा सादर करता येणार असल्याचे आ. पाटील यांनी सांगितले केले आहे.

हा विकास आराखडा राबवताना स्थानिक नागरिक आणि पुजारी बांधवांना विश्वासात घेण्यात आले आहे. भूसंपादनासाठी प्रचलित दरापेक्षा कितीतरी पटीने अधिक मोबदला दिला जाणार असून, एकूण निधीतील 30% रक्कम केवळ भूसंपादनासाठी आरक्षित ठेवण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे केवळ पर्यटनालाच नव्हे, तर स्थानिक तरुणांना शाश्वत रोजगार मिळण्यासही मोठी मदत होणार असल्याचे नमूद केले आहे.

पुढील दोन वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

येणाऱ्या काळात तुळजापूरच्या वैभवात भर टाकणारे काही विशेष प्रकल्प साकारले जाणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना देवी आशीर्वाद देत असतानाचे भव्य 108 फूट उंचीचे शिवभवानी शिल्प, रामदरा तलाव परिसरात भव्य उद्यान, साऊंड अँड लाईट शो आणि वॉटरफ्रंटची कामे हाती घेण्यात येणार आहेत. तुळजापूरचा कायापालट करण्याचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरत आहे. मार्च 2028 पर्यंत हा संपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना दर 15 दिवसांनी या कामाचा आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, प्रशासकीय स्तरावरही या कामाला आता मोठी गती मिळाली असल्याचे आ. पाटील यांनी म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT