Tuljapur drugs case : मुख्य संशयित चंद्रकांत कणेला तळेगावात अटक (File Photo)
धाराशिव

Tuljapur drugs case : मुख्य संशयित चंद्रकांत कणेला तळेगावात अटक

तुळजापूर ड्रग्ज प्रकरण; अद्याप 12 जण फरार

पुढारी वृत्तसेवा

तुळजापूर : येथील एम.डी. ड्रग्ज प्रकरणातील फरार आरोपींना 15 ऑगस्टपर्यंत अटक करण्याची ताकीद पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी 20 जुलै रोजी तुळजापूर भेटीत पोलिस यंत्रणेला देताच, सोमवारी (21 जुलै) या प्रकरणातील मुख्य आरोपी माजी नगराध्यक्ष चंद्रकांत ऊर्फ बापू कणे यांना तामलवाडी पोलिसांनी पुण्यातील तळेगाव दाभाडे येथून अटक केली.

दरम्यान, याच प्रकरणात आणखी एक फरार आरोपी अभिजित अमृतराव याला 18 जुलै रोजी ताब्यात घेण्यात आले होते. या प्रकरणात पोलिसांनी 10 हजार 744 पानांचे दोषारोपपत्र तयार केले आहे. एकूण 38 आरोपींचा यामध्ये समावेश आहे. यामध्ये 28 आरोपी तस्कर, तर 10 जण सेवन गटात समाविष्ट आहेत. यातील 12 आरोपी गेल्या तीन महिन्यांहून अधिककाळ फरारच आहेत.

20 जुलै रोजी पालकमंत्री प्रताप सरनाईक देवीचा कुलधर्म, कुलाचार करण्यासाठी कुटुंबासह तुळजापूर दौर्‍यावर आले होते. यावेळी त्यांनी पोलिसांकडून ड्रॅग्ज प्रकरणाचा सविस्तर आढावा घेतला. महिनोमहिने फरार आरोपी पोलिसांना मिळत नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त करीत 15 ऑगस्टपर्यंत सर्व आरोपींना अटक करा अन्यथा त्यांच्यावर नव्या मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची तयारी सुरू करा असे आदेश दिले होते. त्यानंतर पोलीस यंत्रणा अंग झटकून कामाला लागली. मुख्य सूत्रधार चंद्रकांत ऊर्फ बापू कणे यांना पुण्यातून अटक करण्यात आली. माजी नगराध्यक्ष संतोष कदम-परमेश्वर याला 22 जून रोजी अकलूजमधून (जि. सोलापूर) स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली होती.

धाराशिव कारागृहात 21 आरोपी

तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील 38 पैकी 21 आरोपी सध्या धाराशिव येथील कारागृहात कैद आहेत. तीन जणांना जामीन मिळाला आहे. दोन आरोपी नुकतेच पोलिसांच्या हाती लागले असून आणखी 12 जण फरार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT